शोध न्यूज : तुरुंगात असलेल्या कैद्याने पकडले जाण्याच्या भीतीने चक्क मोबाईलच गिळला परंतु त्याच्या पोटात होऊ लागलेल्या तीव्र वेदनांनी त्याची ही चोरी पकडण्यात आली आणि डॉक्टर देखील हादरून गेले आहेत.
नरक 'वास' !
तुरुंगात असलेल्या कच्च्या कैद्याकडे तसेच शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडे अनेकदा काही आक्षेपार्ह वस्तू सापडतात. कैदी शिक्षा भोगत असताना त्याला कारागृहाचे कडक नियम पाळावेच लागतात पण काही हुशार कैदी या नियमांना देखील हरताळ फसतात. तुरुंगात असतानाही कैद्याकडे गांजा आढळून येतो आणि हा गांजा वेगवेगळ्या प्रकाराने कारागृहात पोहोचत असतो. काही वेळा कारागृहातील यंत्रणेतील काहींचा संबध असतो. काही कैदी तुरुंगात राहूनही बाहेरच्या जगाच्या संपर्कात असतात. कारागृहात बंदिवान असले तरी मोबाईल फोनवरून गुन्हेगारी विश्वाशी त्यांचा संपर्क असतो हे अनेकदा दिसून आले असून या कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या घटना सतत समोर येतात. कधी अचानक तपासणी झालीच तर अनेक कैद्याकडे मोबाईल आढळून येतात. असाच मोबाईल पकडला जाण्याच्या भीतीने एका कैद्याने चक्क मोबाईल गिळून टाकला पण नंतर त्याच्या पोटात वेदना होऊ लागल्या. त्रास होत असतानाही त्याने ही घटना लपविण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर सत्य समोर आले आणि कारागृह प्रशासन देखील हादरून गेले. सन २०२० मध्ये कॅशर अली याला अमली पदार्थासह अटक करण्यात आली होती.
बिहारमधील गोपालगंज येथील एका कारागृहात कॅशर अली नावाचा एक तरुण कैदी अनेक दिवसापासून बंदिवान आहे. त्याच्या पोटात अचानक तीव्र स्वरूपाच्या वेदना होऊ लागल्या त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला डॉक्टरांना देखील त्याच्या पोटात दुखण्याचे कारण लक्षात आले नाही म्हणून त्यांनी एक्स रे घेण्याचा निर्णय घेतला. जेंव्हा एक्स रे समोर आला तेंव्हा डॉक्टर पहातच राहिले. डॉक्टरना त्याच्या पोटात चक्क एक मोबाईल असल्याचे दिसून आले. कॅशर अली याच्याकडे याबाबत विचारणा केली परंतु सुरुवातीला त्याने याबाबत काहीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. सतत विचारणा झाल्यावर मात्र त्याने सत्य सांगितले. तुरुंगात आपल्याकडे मोबाईल होता परंतु तो पकडला जाण्याची भीती होती म्हणून आपण मोबाईल गिळला होता अशी माहिती त्याने डॉक्टर आणि कारागृह प्रशासनाला दिली. त्याच्या पोटातील मोबाईल बाहेर काढणे आवश्यक बनले असून डॉक्टरांपुढे हे एक आव्हान बनले आहे.
कैद्याच्या शस्त्रक्रियेसाठी एका वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात येत असून कॅशर अली या कैद्यास पाटणा येथे पुढील उपचारासाठी पाठविले जाणार आहे. कैद्यापर्यंत मोबाईल पोहोचण्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत आणि त्या उघडकीस देखील आल्या आहेत परंतु मोबाईल गिळण्याची ही घटना अनेकांना धक्का देवून गेली असून तुरुंग प्रशासनातील सुरक्षा यंत्रणा या घटनेने उघडी पडली आहे. (Shocking! Mobile phone found in the stomach of a jail inmate) कॅशर अली याला वेळेत रुग्णालयात नेल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. कारागृह प्रशासनाचे धाबे मात्र या घटनेने दणाणले असून आता कुणाकुणावर कारवाई होऊ शकते याचा अंदाज अधिकारीही घेवू लागले आहेत.
पोटात पाच मोबाईल !
तुरुंगातील कैद्याने या आधीही मोबाईल गिळण्याची एक घटना भलती गाजली होती. दिल्लीच्या कडक सुरक्षा व्यवस्थेच्या तिहार कारागृहात एका कैद्याने तब्बल पाच मोबाईल गिळले होते. रमण सैनी नावाच्या २८ वर्षे वयाच्या एका दरोडेखोर कैद्याने हा प्रकार केला होता. न्यायालयातून परत आणताना त्याची तपासणी करण्यात आली असता मेटल डिटेक्टर बीप बीप असा आवाज करू लागला त्यामुळे त्याच्या पोटात काही असण्याची शंका तुरुंग अधिकारी यांना आली. त्यामुळे त्याच्या पोटात पाच मोबाईल असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !