BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ फेब्रु, २०२३

बस चालकाचे धक्कादायक प्रसंगावधान ! धावत्या बस मधून उडी मारली आणि --

 



शोध न्यूज : शाळेच्या सहलीवर निघालेल्या बसचा ब्रेक फेल झाला आणि चालकाने चक्क धावत्या बसमधून खाली उडी घेत ३४ विद्यार्थ्याचे प्राण वाचाविल्याची एक वेगळी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 


अपघात हा आता नित्याचाच झाला आहे. रोज अनेक रस्त्यावर निरपराध व्यक्तीचा बळी अशा अपघातात जात आहे. प्रवासी बसचे देखील वेगवेगळ्या पद्धतीने आणि विविध कारणांनी अपघात होत आहेत. अशा कठीण परिस्थितीच्या काळात काही नवलाईच्या आणि कौतुकाच्या घटना देखील समोर येत असतात. धावत्या बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर काही वेळा केवळ चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे जीव वाचले जातात. आता मात्र एक वेगळी घटना समोर आली आहे. (The bus brake failed, the driver jumped and stopped the bus)  ३४ विद्यार्थ्यांना सहलीला घेवून निघालेल्या बसचे ब्रेक फेल झाले आणि या सर्व विद्यार्थ्यांचे जीव संकटात आले. अशावेळी बसच्या चालकाने जे केले त्याला तोड नाही. 


बारामती तालुक्यातील मोरगाव येथील खाजगी क्लासच्या ३४ विद्यार्थ्यांना घेवून एक बस (एम एच १२ एच सी ९११९) ही मांढरदेवी दर्शन करून पुढे रायगड किल्ल्याकडे निघालेली होती. मुले सहलीचा आनंद घेत असतानाच भोर येथे चौपाटी परिसरात ही बस आली आणि धावत्या बसचे ब्रेक निकामी झाले असल्याचे चालकाच्या लक्षात आले. बसचा ब्रेक एअर पाईप फुटला त्यामुळे ब्रेक पूर्ण निकामी झाले होते आणि यामुळे कुठल्याही क्षणी अपघात होणार हे अगदी स्पष्ट होते. सहलीला निघालेल्या ३४ विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न होता. ब्रेक निकामी झाल्याने बसचा चालक लाचार झालेला होता, तो काहीच करू शकत नव्हता आणि  करण्यासाठी त्याच्या हातात काहीच नव्हते. अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरी चालक शांत बसला नाही उलट संकटाच्या काळात त्याने जे केले त्याला लोक सलाम करू लागले आहेत. ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात अटळ असल्याने चालक फार तर उडी मारून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करू शकतो. येथे चालकाने उडी मारली पण तो आपला जीव वाचविण्यासाठी नव्हे तर त्याने ३४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. 


ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच त्याने बसमधून खाली उडी मारली आणि धावत बाजूला जाऊन दगड उचलले. चालत असलेल्या बसच्या पुढील टायरखाली त्याने हे दगड टाकले. दगडामुळे बस पूर्णपणे थांबत नाही हे दिसल्यावर त्याने एखाद्या सुपरमन सारखे समोरून हात लावून बस रोखण्याचा देखील प्रयत्न केला, विशेष म्हणजे त्याच्या या प्रयत्नाला यश देखील आले. त्याने टायरपुढे दगड टाकल्याने या दगडामुळे बस थांबली. आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. चालत्या बसमधून चालकाने उडी घेतल्याने बसमधील विद्यार्थी प्रचंड गोंधळून आणि घाबरून गेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसू लागला होता परंतु चालकाने दाखविलेल्या या आगळ्यावेगळ्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या चालकाचे प्रचंड कौतुक होऊ लागले आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्यामुळे घटना नेमकी कशी घडली हे पाहायला मिळू लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !