BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ फेब्रु, २०२३

विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्यास पंढरपूर पोलिसांकडून अटक !

 


शोध न्यूज : गावठी बनावटीचे पिस्तुल घेवून अंधारात थांबलेल्या एकाला पंढरपूर शहर पोलिसांनी पकडले असून रात्रीच्या वेळी तो संशयास्पद रितीने थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 


पंढरपूर शहराला अध्यात्मिक परंपरा आहे तशी गुन्हेगारीची देखील मोठी पार्श्वभूमी आहे. कधी काळी या देवाच्या गावात भरदिवसा नंग्या तलवारी नाचत होत्या तर भर रस्त्यावर परस्परांचे खून केले जात होते. टोळीयुद्धाचा मोठा प्रभाव पंढरीत होता परंतु मागील वीस पंचवीस वर्षात हे प्रकार पूर्ण संपले नसले तरी मोठ्या प्रमाणात ते कमी झालेले आहेत. असे असले तरी अधून मधून गुन्हेगारी डोके वर काढत असतेच त्यामुळे पोलीस सदैव 'सावध' असतात. तलवारीच्या जागी अलीकडे गुन्हेगारीसाठी पिस्तुलाचा वापर होत असून असाच एक पिस्तुलधारी पंढरपूर पोलिसांनी गजाआड केला आहे. 


परवाना नसलेला गावठी देशी बनावटीचे एक पिस्तुल (गावठी कट्टा ) जवळ बाळगत अंधारात थांबून असलेल्या एका व्यक्तीबद्धल पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली आणि पोलिसांनी लगेच धाव घेत कारवाई केली. पंढरपूर येथील अंबाबाई पटांगण येथे ताडी विक्री केंद्राच्या जवळ रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती संशयास्पदरित्या उभा असल्याचे आणि त्याच्याकडे विनापरवाना पिस्तुलासारखे काही शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसाने अंबाबाई मैदानाकडे धाव घेतली. तेथे पहिले असता पोलिसांना एक व्यक्ती अंधारात उभा असलेला दिसला. पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्याला गराडा घालून पकडले आणि चौकशी केली असता त्याने आपले नाव धनाजी सिद्धेश्वर आटकळे असल्याचे सांगितले. पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील ही ३८ वर्षे वयाची व्यक्ती आहे. 


पोलिसांनी त्याची चौकशी करीत त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तुल दिसून आले. विनापरवाना पिस्तुल घेवून तो अंधारात संशयास्पद रितीने थांबलेला होता आणि पोलीस चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. शहर पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज हेंबाडे, हवालदार ढेरे, पोलीस नाईक माने, शरद मंडले यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पोलीस कर्मचारी मंडले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. (Pandharpur police arrested a person carrying a pistol without a license) त्याने कशासाठी पिस्तूल बाळगले ? पिस्तुल घेवून तो अंधारात थांबून का राहिला होता ? त्याने हे पिस्तुल कुणाकडून आणि कशासाठी मिळवले ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून मिळणार आहेत. या घटनेने मात्र पंढरीत खळबळ उडवून दिली आहे .  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !