BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ फेब्रु, २०२३

अडेल प्रवाशाने मारली कंडक्टरच्या कानाखाली, एस टी थेट पोलीस ठाण्यात दाखल !

 


शोध न्यूज : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये गर्दी झाल्यामुळे कंडक्टर प्रवाशांना पुढे सरकण्यासाठी सांगत असताना एका प्रवाशाने थेट वाहकाच्या कानाखाली आवाज काढल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली असून प्रवाशाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एस टी बस मध्ये अनेकदा मोठी गर्दी होत असते आणि यावेळी सर्व प्रवाशांना सामावून घेणे आणि त्या सर्वाना तिकीट देणे हे वाहकाच्या पुढे एक आव्हान असते.  अनेक प्रवासी बसमध्ये उभे असतात पण पुढे सरकत नसल्याने नव्याने येणाऱ्या प्रवाशाला बसमध्ये जाता येत नाही म्हणून कंडक्टर सतत 'पुढे सरका, पुढे सरका' म्हणून सांगत असतात. काही प्रवासी सरकतात पण काही पुढे सरकल्यासारखे करून जागीच थांबून राहतात. अशा वेळी कंडक्टरची तारांबळ होत असते तर नव्याने बस मध्ये चढणाऱ्या प्रवाशांची अडचण होत असते. अशावेळी कंडक्टर प्रवाशांच्या गर्दीत जाऊन नव्या प्रवाशांना जागा करून देत असतात. नेमक्या अशाच वेळी एका प्रवाशाने कंडक्टरच्या कानाखालीच 'आवाज' काढला आणि धमकीही दिली आहे. 


मोहोळकडून बार्शीकडे जाणाऱ्या एस टी बस मध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी होती. एक प्रवासी मध्येच अशा पद्धतीने उभा राहिला होता की इतर प्रवाशांना पुढे मागे जाता येत नव्हते. मध्येच जागा आणि वाट अडवून उभ्या असलेल्या या प्रवाशास वाहकाने पुढे सरकण्यास सांगितले पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान ही बस नरखेड येथे आली असता पुन्हा काही प्रवासी बसमध्ये चढले आणि मध्ये थांबलेल्या प्रवाशामुळे होणारी अडचण आणखी वाढली. यावेळी पुन्हा त्या प्रवाशाला वाहकाने पुढे सरकण्याची सूचना केली पण तो जगाचे हलायला तयार नव्हता. (ST passenger assaulted conductor, case file in police) अखेर वाहक विष्णू जनार्दन काटे हे त्या प्रवाशाच्या जवळ पोहोचले आणि त्याला थोडे पुढे सरकून अन्य प्रवाशांना रस्ता देण्यासाठी सांगितले. 


वाहकाने कितीही सांगितले तरी हा प्रवासी जगाचे हलायला तयार नव्हता आणि त्याच्यामुळे अन्य प्रवाशांची अडचण झाली होती. अखेर वाहक काटे हे त्या प्रवाशाच्या जवळ गेले आणि त्याला समजाऊन सांगू लागले पण तो ऐकायला तयार नव्हता. उलट त्याने वाहकाच्या गच्चीला पकडून शिवीगाळ सुरु केली आणि नंतर तर थेट त्यांना चापट मारून धमकी दिली. 'पुढे मालवंडी गावात चल, तुला तेथे बघतो' अशी धमकी देत त्याने आपली मग्रुरी तशीच ठेवली.  ही घटना घडली त्यामुळे चालकाने आपली बस थेट पोलीस ठाण्यात नेली आणि सदर प्रवासी अभय सुखदेव भडकवाड याच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. हा प्रवासी मोहोळ तालुक्यातील अनगर येथील असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !