शोध न्यूज : थोड्याशा चुकीने विजेच्या धक्क्याचा अनुभव प्रत्येकाला कधी न कधी येतच असतो पण चक्क नदीच्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरून एका म्हशीचा जीव गेला तर एका महिलेला शॉक लागल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
विजेचा धक्का बसणे आणि या धक्क्यात प्राणहानी होणे हे काही नवे नाही. कुणाच्या तरी चुकीने आणि बेपर्वाईने विजेचा धक्का बसत असतो. अनेकादा हा धक्का माणसांचा जीव घेवूनच थांबतो. शेतकरी रोजच्याप्रमाणे शेतातील विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेल्यावरही एखाद्या दिवशी त्याला विजेचा धक्का बसतो आणि त्याचा मृत्यू होतो. अशा वाईट घटना सतत आजूबाजूला घडताना दिसतात पण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक वेगळी आणि तितकीच धक्कादायक, चिंताजनक घटना घडली आहे. चुकीने का होईना पण विजेशी संपर्क आल्याशिवाय विजेचा धक्का बसत नाही त्यामुळे सदैव दक्ष राहावे लागते. येथे मात्र नदीच्या पाण्यातच विजेचा प्रवाह उतरल्याचे आणि त्यामुळे एका म्हशीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका महिलेलाही नदीच्या पाण्यात विजेचा शॉक बसला आहे त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सौदागर नाना खरात यांच्या पत्नी म्हशीला पाणी पाजण्यासाठी म्हशीला सीना नदीत घेवून गेल्या.म्हैस पाणी पिण्यासाठी नदीत उतरली आणि अचानक पाण्यात बसली. हा प्रकार काहीतरी वेगळा वाटल्याने खरात यांच्या पत्नी नदीच्या पाण्यात जाऊ लागल्या. पाण्यात पाय ठेवताच त्यांच्या पायालाही मुंग्या आल्यासारखे आणि काहीतरी वेगळे जाणवले. म्हशीला बांधलेली दोरी फेकून देत त्या धावत पाण्याबाहेर आल्या आणि धावत घरी जाऊन त्यांनी आपल्या पतीला एकंदर घटनेची माहिती दिली. सदर माहिती मिळताच सौदागर खरात, बंडू वसंत गावडे, तानाजी अण्णा वाघमोडे, अभिमान नाना खरात हे सगळे नदीकडे धावले आणि त्यांनी पाहिले असता म्हैस पाण्यात पडलेल्या अवस्थेत दिसली.
सदराचा प्रकार हा पाणबुडी मोटारीच्या केबलच्या जोदातून विद्युत प्रवाह नदीच्या पाण्यात उतरला असल्याने म्हशीचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. गावातीलच बबन सूर्यभान मेलगे यांनी त्यांच्या शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी पाणबुडी मोटार नदीवर बसविली आहे आणि केबलचा जोड धोकादायक होता याची जाणीव सौदागर खरात यांनी वेळोवेळी बबन मेलगे यांना सांगितला होता परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच ही घटना घडली अशी तक्रार खरात यांनी केली आहे. (A current of electricity descended into the water of the river) विजेच्या धक्क्याने म्हैस मृत्युमुखी पडली आणि खरात यांच्या पत्नीला विजेचा धक्का लागला. त्या वेळीच बाहेर निघाल्या म्हणून बचावल्या अन्यथा त्यांचीही गत म्हशीसारखीच झाली असती असे खरात यांनी आपल्या तक्रारीत म्हटले असून याप्रकरणी पाणबुडी मोटार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !