BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ फेब्रु, २०२३

हुंड्यात कार मिळाली नाही म्हणून भर लग्नमंडपातून नवरदेवच गेला पळून !



शोध न्यूज : हुंड्यात कार मिळाली नाही त्यामुळे ऐन लग्नाच्या वेळी भर लग्नमंडपातून नवरदेवानेच धूम ठोकली त्यामुळे उडालेला गोंधळ शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचला.


अलीकडे खोटी नवरी उभी करुन लग्नही खोटी लागतात आणि लग्नानंतर नवी नवरी दागिन्यांसह पळून जाते. लग्नं जुळविण्यासाठी दलालाने आधीच काही रक्कम घेतलेली असते. अशा प्रकाराने फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या उघडकीस आलेल्या आहेत. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने निराश होऊन काही तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, मुलींची कमी संख्या आणि अवाजवी अपेक्षा यामुळे तरुणांची लग्न जुळणे ही एक मोठी समस्या बनली आहे. याचाच गैरफायदा उठवत लग्नाळू तरुणांची मोठी फसवणूक केली जाते. या घटनेत मात्र वेगळेच घडले असून नवरी नव्हे तर नवरा मुलगाच लग्नाच्या मंडपातून पळून गेला आहे. पुराणात घडलेली अशी एक कथा सर्वांना माहित आहे पण त्यानंतर अशा घटना ऐकीवात नाहीत. ऐनवेळी विवाह मोडले जातात पण मंडपातून अचानक नवरा मुलगाच पळून जातो हा प्रकार तसा दुर्मिळच आहे त्यामुळेच याची चर्चाही रंगू लागली आहे.


हुंड्यात कार मिळाली नाही म्हणून या नवरोबाने मंडपातून पळ काढल्याची ही अजब घटना चंडीगड येथील आहे. नवरा पळाला पण त्याने पळण्याचेही नियोजन केले होते. चरखीदादरी येथील तरुणीचा भिवानी येथील तरुणाशी विवाह निश्चित करण्यात आला होता. चरखीदादरी येथील रोहतक रोडवर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंडप सजला होता, वऱ्हाडी मंडळी विवाहासाठी मंडपात दाखल झालेले होते. सप्तपदीचा मुहूर्त झाल्यामुळे वराला मंडपात घेऊन येण्याचा आदेश झाला पण त्यानंतर वेगळेच नाटक सुरु झाले. नवरा मुलगा आणि त्याची आई यांनी वेगळीच भूमिका घेतली. 'आम्हाला मोटार सायकल नको तर कार घेवून द्या' अशी मागणी नवरा मुलगा आणि त्याच्या आईने केला. आता रात्रीच्या वेळी ही मागणी पूर्ण करणे केवळ अशक्य होते त्यामुळे हा एक वेगळाच गुंता निर्माण झाला. 


वधू पक्ष या मागणीने गोंधळून गेला होता. कार देण्याचीही त्यांची तयारी होती पण एवढ्या रात्री अचानक कार कशी देणार? असा सवाल वधू पक्षाने केला. यावर देखील नवरा मुलगा आणि त्याच्या आईने तोडगा काढला. 'रात्रीमुळे अशक्य आहे तर कार घेण्यासाठी पैसे द्या, आम्ही कार घेऊ'  असा पवित्रा वधू पक्षाने घेतला. कार घेण्यासाठी पंधरा लाखांची मागणी करण्यात आली. एवढ्या रात्री अचानकपणे पंधरा लाखांची मागणी झाली पण ही रक्कम अचानक देणेही अशक्य होते. वधूपक्ष गयावया करू लागला, हात जोडू लागला पण वर पक्ष काही राजी होत नव्हता. (Demanding a car, The groom ran away from the wedding hall, ) कार किंवा रक्कम आत्ताच मिळत नाही हे लक्षात येताच लग्नं टाळण्यासाठी नवरदेवाने वेगळाच बहाणा केला. त्याने आपल्याला चक्कर येत असल्याचे सांगितले. 


नवरदेवाला चक्कर येत असल्याचे सांगून त्याच्या आईने आणि इतर नातेवाईकानी मुलाला दवाखान्यात घेवून जातो म्हणून मंडपातून बाहेर नेले. वऱ्हाडी मंडळी लग्नाची वाट पाहत खोळंबली होती आणि नवरा मुलगा मात्र दवाखान्यात जातो म्हणून मंडपातून बाहेर पडला. पाठोपाठ नवरीच्या वडिलांनीही दवाखान्यात धाव घेतली. तेथे जाऊन पहिले तर नवरा मुलगा दवाखान्यात आलेलाच नाही, दवाखान्यात मुलाची आई अथवा अन्य कुणीच पोहोचले नाही हे लक्षात आले तेंव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मात्र वधूपित्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. ऐन लग्नाच्या वेळी भर मंडपातून नवरा मुलगा पळाला पण कुणाच्याच लक्षात आले नाही. चक्कर येण्याचा बहाणा करून तो गेला आणि तिकडेच गायब झाला. या एकूण प्रकाराने लग्नमंडपात केवळ गोंधळ, गदारोळ आणि  आश्चर्य एवढेच अनुभवायला मिळत राहिले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !