शोध न्यूज : एका गाईने एकाचवेळी तब्बल चार वासरांना जन्म दिल्याची एक दुर्मिळ घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली असून तालुकाभर हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
निसर्गनियमापेक्षा कधी कधी काहीतरी वेगळे घडते आणि अशी घटना घडली की लोकांना ते आश्चर्यकारक वाटते आणि तो प्रसंग अथवा घटना डोळ्यात साठविण्यासाठी लोक गर्दीही करतात आणि चर्चा देखील सुरु राहते. गाईने वासराला जन्म देणे हा निसर्गनियम आहे, गाय एकावेळी एक किंवा दोन वासरांना जन्म देते आणि यावेळी काही वेगळे वाटत नाही. मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील एका गाईने मात्र सगळ्यांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे आणि या गाईची लोकात मोठी चर्चाही सुरु झाली आहे. कारणही तसेच घडले असून या गाईने एकाचवेळी तब्बल चार वासरांना जन्म दिला असून यात एक खोंड तर तीन कालवडी यांचा समावेश आहे. गाय आणि चार वासरे यांची प्रकृती उत्तम असून ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातून ही गाय आणि वासरे पाहण्यासाठी देखील गर्दी होऊ लागली आहे.
मोहोळ तालुक्यातील पापरी येथील गणेश लोंढे यांची ही गाय असून त्यांनी ही लक्ष्मी नावाची गाय २०१८ मध्ये खरेदी केली होती. या गाईने आत्तापर्यंत तीन वेळा वासरे दिली आहेत परंतु एकाच वेळी चार वासरांना जन्म देण्याची ही या गाईची पहिलीच वेळ आहे. या दुर्मिळ घटनेची चर्चा होत असली आणि लोक मोठ्या कौतुकाने पाहायला येत असले तरी ही लक्ष्मी नावाची गाय आपल्यासाठी खरोखरच 'लक्ष्मी' ठरली असल्याची प्रतिक्रिया गाईचे मालक गणेश लोंढे यांनी व्यक्त केली आहे. (Rare! A cow gave birth to four calves at the same time in Solapur district.) लोंढे यांनी मुंबईतील नोकरी सोडून परत आपल्या गावी येऊन शेती करणे पसंत केले होते. २०१७ साली ते मुंबईहून परत आल्यानंतर त्यांनी ही लक्ष्मी गाय खरेदी केली होती. या गाईने आता एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला आहे आणि हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !