BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ फेब्रु, २०२३

जिच्यावर झाला बलात्कार तिलाच न्यायालयाने ठोठावली शिक्षा, आरोपी मात्र सुटला !

 


शोध  न्यूज : जिच्यावर बलात्कार झाला त्याच पिडीतेला जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला मात्र न्यायालयाने मुक्त केले आहे.


अलीकडे महिला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारात वाढ होत असून विनयभंग आणि बलात्काराचे अनेक गुन्हे रोज दाखल होत आहेत. महिला संरक्षणासाठी कडक कायदे अस्तित्वात असतानाही महिला अत्याचार कमी होताना दिसत नाहीत.  अनेक नराधम बलात्कार करून देखील न्यायालयातून सहीसलामत कसे सुटता येईल यासाठी प्रयत्न करीत असतात. काही आरोपी सुटतात तर काही शिक्षा भोगायला जात असतात. गुन्हे करूनही न्यायालयासमोर पुरावे आणि साक्षी आपल्या विरोधात जाणार नाहीत याची काळजी घेतली जाते. चिखली तालुक्यात मात्र एक वेगळी आणि दुर्मिळ घटना घडली असून बलात्काराचा आरोप असलेला तरुण निर्दोष मुक्त झाला आहे तर जिच्यावर बलात्कार झाला तिलाच न्यायालयाने शिक्षा आणि दंड सुनावला आहे. 


चिखली तालुक्यातील किन्हीनाईक या गावातील हे बलात्कार प्रकरण असून २७ वर्षे विवाहित महिलेने याबाबत पोलीसात फिर्याद दिली गेली होती. पती परगावी गेले असताना पिडीत महिलेच्या पतीच्या मित्राने बलात्कार केल्याचा आरोप या पिडीत महिलेने केला होता. तू मला आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू जर मला हो म्हटले नाही तर मी जीव देईन' अशी भीती दाखवत प्रमोद नावाच्या आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर काही दिवसांनी तो पिडीत महिलेवर पुन्हा पुन्हा बलात्कार करीत राहिला. अखेर सदर महिला पोलिसात गेली आणि तिने याबाबत आपली तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली आणि न्या. आर. एन. मेहरे यांनी या खटल्याचा निकाल दिला आहे. 


बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला या खटल्यात काय शिक्षा होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली तर जिच्यावर बलात्कार झाला त्या पिडीत महिलेस दोन महिन्यांची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयात खटला सुरु असताना पिडीत महिलेने दिलेली साक्ष फिरवलेली होती. पोलिसांना तिने वेगळा जबाब दिला होता आणि न्यायालयात मात्र उलट जबाब दिला. आरोपीने तिच्यासंदर्भात कुठलेही कृत्य केले नाही असाच पुरावा तिने न्यायालयात दिला त्यामुळे फिर्यादी असलेली पिडीत महिला हीच फितूर झाली असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. न्यायालयाने आरोपी प्रमोद याची पुराव्याअभावी  निर्दोष मुक्तता केलीच पण बलात्कार पिडीत फिर्यादी महिलेला मात्र साक्ष फिरविल्यामुळे न्यायालयाने दोन महिने कारावास आणि पांचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 


साक्ष फिरविणाऱ्या पिडीत महिलेविरोधात प्रकरण दाखल करून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर पिडीत महिलेच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमानुसार वेगळी कार्यवाही करण्याबाबतचे मत निकाल देतेवेळी नोंदविली. सरकार पक्षालाही समाविष्ट करण्यात आले होते.  पिडीत विवाहित महिलेस नोटीस देवून तिला तिचे म्हणणे मांडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली परंतु तिने वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली नाही आणि संधी दिलेली असतानाही आपले म्हणणे न्यायालयात सादर केले नाही. न्यायालयात खोटी साक्ष दिली तसेच तिने केलेल्या तक्रारीमुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती त्यामुळे तिला कठोर शिक्षा दिली जावी असे युक्तीवादात म्हटले गेले होते. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने साक्ष फिरविणाऱ्या महिलेस दोन महिने साधा कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 


बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात पिडीत आणि फिर्यादी महिलाच न्यायालयात साक्ष फिरवते आणि बलात्कार केल्याचा आरोप ज्याच्यावर केला त्याचीच बाजू न्यायालयात घेते असे प्रकरण समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (The court sentenced the rape victim, but the accused was found innocent) बलात्काराची अनेक प्रकरणे खोटी असतात असे अनेकदा म्हटले जाते परंतु येथे तर बलात्कार पिडीत महिलाच आरोपीच्या बाजूने उभी राहिली त्यामुळे हे प्रकरण धक्कादायक मानले जात आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !