BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२३

बार्शी फटाका स्फोटातील आरोपी नाना पाटेकर याला अखेर बेड्या !

 


शोध न्यूज : बार्शी फटाका स्फोट प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी नाना पाटेकर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एक महिन्यापासून तो वेषांतर करून पोलिसांना हुलकावणी देत फिरत होता. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरी येथील फटक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन या घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सदर कारखाना हाच विनापरवाना असल्याचे उघड झाले होते आणि कारखाना मालक युसुफ मणियार तसेच नाना पाटेकर हे दोघेही घटना घडताच पसार झाले होते. यातील युसुफ मणियार याला पांगरी येथील ज्वारीच्या पिकात लपून बसलेला असताना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते, शिवाय त्याच्या मुलालाही मुंबईला जातानाच अटक करण्यात आली होती. या घटनेतील आणखी एक प्रमुख आरोपी नाना पाटेकर हा मात्र पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाला होता. घटना घडल्याच्या क्षणापासून पोलीस त्याच्या मागावर होते. नंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. उस्मानाबाद येथील गणेश नगर परिसरात राहणारा मालक तथा भागीदार नाना शिवाजी पाटेकर हा अटकेच्या भीतीने गायब झाला होता आणि पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. 


आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली होती आणि सोलापूर, विजयपूर, हुबळी परिसरात एक पथक तर ठाणे, मुंबई, पुण्याच्या दिशेने दुसरे पथक पाठविण्यात आले होते. एक पथक उस्मानाबाद, केज, बीड, धारूर, कळंब आदी भागात आरोपीचा शोध घेत होते. युसुफ मणियार हा पोलिसांच्या हाती लागला पण नाना पाटेकर हा मात्र पोलिसांना हुलकावण्या देण्यात यशस्वी होत होता.  पळून जाऊन आपले आस्तित्व लपविण्याचा प्रयत्न पाटेकर करीत होता आणि पोलीस देखील जिद्दीने त्याचा शोध घेत होते. गोपनिय माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने पोलीस त्याची माहिती काढत असताना नाना पाटेकर हा महाराष्ट्र सोडून गेल्याची देखील माहिती पोलिसांच्या हाती आली होती. तो महाराष्ट्रातून तामिळनाडू राज्यात गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचे पथक तामिळनाडूला रवाना झाले.


तामिळनाडू राज्यात जाऊन पोलिसांच्या पथकाने या नाना पाटेकरचा शोध सुरु केला. कोईमतूर, मदुराई, शिवकाशी अशा भागात या आरोपीचा शोध घेतला गेला. पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीने आरोपीचा ठावठिकाणा मिळवला आणि नाना पाटेकर याच्या मुसक्या आवळल्या. त्याची नेमकी माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावला आणि त्याला शिवकाशी येथून ताब्यात घेतले. (Barshi firecracker blast, accused Nana Patekar  arrested from tamilnadu)नाना पाटेकर हा आपली ओळख लपवत आणि वेषांतर करून पोलिसांना गुंगारा देत होता परंतु पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचले असून त्याला अटक करून मोठे यश मिळवले आहे.  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !