BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२३

गौतमी पाटलांच्या कार्यक्रमात राडा, महिलांनी हुल्लडबाजांना दांडक्यानी मारले !

 


शोध न्यूज : लावणी नर्तिका गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला असून हुल्लडबाज तरुणांना महिलांनी अक्षरश: लाकडी दांडक्याने मारल्याची घटना समोर आली असून यामुळे गौतमी पाटील (Gautami Patil)  पुन्हा चर्चेत आल्या आहेत. 


लावणी कलावंत गौतमी पाटील या मागील अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद तर लाभत आहेच पण त्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, राडा, धिंगाणा हा नेहमीच होत असतो आणि त्यामुळे या कार्यक्रमाची देखील चर्चा होत असते.  शिवाय गौतमी पाटील या त्यांच्या नृत्याबाबत वादग्रस्त देखील ठरत असून त्या अश्लील नृत्य करीत असल्याचा आरोप देखील यापूर्वीच त्यांच्यावर झाला आहे . त्यांच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचीही मागणी पुढे आली आहे . त्यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी  धुडगूस घातल्याच्या घटना काही नव्या नाहीत . अशा घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल देखील होत असतात. त्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून त्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रेक्षकांनी 'राडा' केला आहे. 


पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात बहिरवाडी गावच्या भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त  गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. 'सबसे कातील, गौतमी पाटील' असे फलक देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी लावले गेले होते.  अपेक्षेप्रमाणे त्यांच्या या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळाला होता पण काही तरुणांनी या कार्यक्रमात भलतीच हुल्लडबाजी केली आणि कार्यक्रमाला वेगळे वळण लागले.  लावणी नृत्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला पण या हुल्लडबाज तरुणांमुळे कार्यक्रमाला गालबोट लागले आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.  या गोंधळामुळे आयोजक आणि गौतमी पाटील यांना कार्यक्रम थांबविण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम थांबविण्याचा निर्णय घेतला. 


ही सगळी हुल्लडबाजी सुरु असताना आणखी एक अनपेक्षित प्रकार यावेळी घडला. गावातील काही महिलांनी हातात दांडके घेत आक्रमण केले आणि हुल्लडबाज तरुणांना बदडून काढले.  या अतिउत्साही हुल्लडबाज तरुणांना या महिलांनी हातात काठ्या घेउन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न या महिलांनी केला. कार्यक्रम पुन्हा सुरु झाला तरी प्रत्येक गाणे झाले की हुल्लडबाज तरुण गोंधळ घालतच राहिले. (Young people rioted again in Lavani artist Gautami Patil's program)  या घटनेचाही व्हिडीओ व्हायरल झाला असून गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  पाटील यांच्या कार्यक्रमात या आधीही असा धुडगूस घातला गेल्याने कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे अलीकडेच लावणी कार्यक्रम सुरु असताना मंचावरच गौतमी  पाटील नृत्य करीत असताना त्यांच्या  जवळच एका अतिउत्साही तरुणाने फटाका लावण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे गौतमीने लगेच आपले नृत्य थांबवले होते. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !