शोध न्यूज : रब्बी हंगामासाठी उजनी धरणातून आज पाणी सोडण्यात येत असून कालव्यातून सोडले जाणारे हे पाणी एका महिनाभर कालव्यात प्रवाहित राहणार आहे. २३ अथवा २४ जानेवारीपासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.
यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहात राहिल्या आणि धरणांची पातळी वेगाने वाढली. पावसाळा संपत आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात देखील जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात सर्वत्र नद्या, नाले, तलाव, विहिरी यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला व जमिनीतील पाणी पातळी चांगल्या प्रमाणात वाढल्यामुळे रब्बी हंगामात सुरुवातीला कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी मागणी फारशी आली नाही, परंतु आता गहू, ज्वारी, हरभरा, आदी रब्बी पिके तर खोडवा, अडसाली ऊस, सुरू उसाच्या लागणी व द्राक्ष डाळिंब केळी आदी फळबागा या पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागल्याने कालवा मंडळाच्या बैठकीतील नियोजनानुसार रब्बीचे एक महिन्यासाठीचे आवर्तन १७ जानेवारीपासून सुरू होत आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता साळे यांनी दिली आहे. पाणी सोडताना प्रारंभी पाचशे क्युसेक्सने सुरुवात केली जाणार असून ते दोन दिवसात तीन हजार क्युसेक्स पर्यंत वाढवले जाणार आहे.
उजनीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून हे पाणी सोडण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दहा लाख एकर क्षेत्राला याचा लाभ मिळणार आहे. रब्बी हंगामासाठी उजनीच्या पाण्याची शेतकऱ्याना प्रतीक्षा होतीच ती आता दूर होत असून कालव्याद्वारे महिनाभर उजनीचे पाणी प्रवाहित राहणार आहे. सोलापूर शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी २३ अथवा २४ जानेवारीला भीमा नदीतून धरणाचे पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या टाकळी व चिंचपूर बंधाऱ्यापैकी टाकळी बंधाऱ्यातील पाणी पातळी संपली आहे परंतु चिंचपूर बंधाऱ्यात काही प्रमाणात पाणीसाठा अद्यापही शिल्लक असल्यामुळे जानेवारी २०२३ अखेर पर्यंत सोलापूर शहराला पाणीटंचाई भासणार नाही. शहर पाणीपुरवठा नियोजनानुसार व सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या पाणी मागणीनुसार शहराची पुढील पाणीटंचाई टाळण्यासाठी म्हणून २३ किंवा २४ जानेवारी २३ पासून धरणातून भीमा नदीत ५ हजार क्यूसेक्स किंवा याहीपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येणार आहे.
१६ जानेवारी २०२३ रोजी उजनी धरणात १००.२२ टक्के पाणी आहे. अद्याप पर्यंत उजनी धरणातून शेतीसाठी भीमा सीना जोड कालव्यातून (बोगदा) ७०० क्युसेक्स तर दहिगाव (करमाळा) उपसा सिंचन योजनेतून ६० क्युसेक्स पाणी चालू आहे. (Water will be released today from Ujani Dam for Rabi season)आज १७ जानेवारी- मंगळवारपासून उजनी कालव्यातून ३ हजार क्युसेक्स पाणी सोडले जाणर आहे त्यामुळे शेतकरी या पाण्यासाठी सज्ज झाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !