BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२३

पंढरपूर तालुक्यात पांढऱ्या दुधाचा काळा धंदा उघडकीस !


 


शोध न्यूज : पूर्णान्न समजले जाणारे दुध रोज सकाळी घराघरात जाते परंतु पंढरपूर तालुक्यात पांढऱ्या दुधाचा काळा धंदा सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

घराघरात आवश्यक असलेले दूध हे भेसळयुक्त असल्याचे अनेकदा आढळून आले आहे आणि दुधात भेसळ करणाऱ्यावर कारवाई देखील झाली आहे. दुधात पाणी मिसळून सर्रास विक्री होतच असते पण अलीकडे या दुधात केमिकल मिसळले जात असल्याचेही प्रकार उघडकीस येत आहेत. महागड्या दराने पाणी दार दुधाची विक्री होत असतानाच केमिकल देखील मिसळले जाऊ लागले आहे. घराघरात लहान बालकांना अन्न म्हणून दूध दिले जाते पण हे दूध विषारी असल्याचा धक्कादायक प्रकार अधूनमधून उघडकीस येत असतो. असाच एक मोठा आणि खळबळजनक प्रकार पंढरपूर तालुक्यात उघडकीस आला असून यामुळे दूध ग्राहकांना धक्का बसला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या दुधाची अचानक तपासणी केली जावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे परंतु अन्न आणि औषध प्रशासन याकडे गंभीरपणे पाहताना दिसत नाही. आज मात्र पंढरपूर तालुक्यात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. 


अमृत समजल्या जाणाऱ्या दुधात घातक केमिकलची भेसळ करणाऱ्या एका टोळीलाच पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केला असून यात पंढरपूर तालुक्यातीलच काही व्यक्ती कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील एका दूध डेअरीकडे निघालेले केमिकल जप्त करण्यात आले आहे. वाहनात भरून केमिकलचे तब्बल मोठे चौदा कॅन आढळून आले असून दुधाची गुणवत्ता वाढीसाठी अशा केमिकलचा वापर केला जात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कमर्चारी सावंत हे रात्रीची गस्त घालत असताना मध्यरात्रीच्या अंधारात दोन वाहने त्यांना आढळून आली. वाखरी- गुरसाळे बायपास रस्त्यावर पुलाजवळ ही वाहने त्यांना संशयास्पद असल्याचे जाणवले. पाहणी केली असता टाटा इंट्रा टेंपोत दुधाचे रुकामे १९ कॅन होते तर अशोक लेलंड टेंपोमध्ये प्लास्टिकचे निळ्या रंगाचे १४ कॅन दिसून आले. (Black business of white milk in Pandharpur taluka) यात पांढऱ्या रंगाचे लिक्विड असल्याचे दिसून आले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तिघांकडे चौकशी केली असता हे लिक्विड म्हणजे दुधात भेसळ करण्यासाठीचे केमिकल असल्याचे समोर आले.  


सदर प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील वृन्दावनम सोसायटी, रो हाऊस क्र. ३८ येथे राहणारे निलेश बाळासाहेब भोईटे, फुलचिंचोली येथील काळे मळा येथे राहणाऱ्या परमेश्वर सिद्धेश्वर काळे आणि टाकळी रोडवरील गणेश नर्सरीजवळ सुरेंद्र कुलकर्णी यांच्या घरी राहणाऱ्या गणेश हनुमंत गाडेकर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु केली आहे. दुधाचे कॅन आणि पांढऱ्या रंगाच्या लिक्विडबाबत चौकशी केली असता तिघांकडून माहिती मिळाली आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सुमित मेहता यांच्याकडून दुधात भेसळ करण्यासाठी हे लिक्विड आणण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


या धक्कादायक प्रकाराबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून सदर पथक पंढरपूर येथे दाखल झाले आहे. सदर लिक्विडचे नमुने त्यांनी घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. विविध प्रकारच्या अन्नात भेसळ होत असताना आता चक्क दुधात देखील भेसळ होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले असल्याने लहान मुलांच्या मुखात हे केमिकल ओतायचे काय ? असा सवाल आणि भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !