BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२३

लाचखोर सरपंच, ग्रामसेवक यांना दहा वर्षांचा कारावास !

 


शोध न्यूज : लाचखोर सरपंच, ग्रामसेवक आणि वसुली अधिकारी यांना सोलापूर न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावलीअसून चार हजाराचा दंडही ठोठावाला आहे. घरकुल प्रकरणात २५ हजारांची लाच घेतल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला असल्याने ही शिक्षा सुनावली गेली आहे.


लाचखोरीचे प्रमाण भलतेच वाढले असून शासकीय अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर लोकप्रतिनिधी देखील लाचखोरीच्या प्रकरणात अडकताना सतत दिसत आहेत. जनतेची सेवा करण्याच्या गप्पा मारत निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर सेवा विसरून मेवा खाण्यातच त्यांना अधिक रस असतो. सर्वसामान्य जनतेत देखील याविषयी चर्चा सुरु असते. गावाची सेवा करणारा ग्रामसेवक तर स्वत:ला गावाचा मालक समजत असल्याचे काही प्रकरणात समोर येते. नागरिक नागरी समस्यांसाठी कोकलत असतांना ग्रामसेवक हा 'आपल्याला काय देणेघेणे ?' अशा थाटात वावरत असतो. 'गाढवीण सवाशीण' अशी अवस्था काही ग्रामसेवकांची असते आणि गावाच्या नागरिकांच्या गैरसोईचे त्याला कसलेच सोयरसुतक नसते अशा थाटात हा सामान्य असलेला कर्मचारी वावरत असतो. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात साटेलोटे होऊन अनेक गैरप्रकार घडत असतात आणि अशाच एका प्रकरणी तिघेजण खडी फोडायला जाण्याच्या रस्त्याला लागले आहेत. 


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील तत्कालीन सरपंच नवनाथ तुळशीदास अनुसे, तत्कालीन ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांना दहा वर्षांची सक्तमजुरीची तर वसुली अधिकारी मोहम्मद कचरूद्दीन पठाण यास पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.   मंजूर घरकुलाचा दुसरा आणि तिसरा हप्ता संबंधित लाभार्थी यांना देण्यासाठी मोहोळ पंचायत समितीकडे अहवाल पाठविण्याच्या निमित्ताने तब्बल २५ हजार रुपयांची लाच यांनी मागितली होती. लाच मागणीनंतर तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि आपली तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली आणि सापळा लावला या सापळ्यात सरपंच आणि ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. 


सदर लाचखोरीची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर झाली आणि आरोपींनी लाच घेतल्याचे प्रकरण सिद्ध झाले. यात सरपंच नवनाथ तुळशीदास अनुसे, ग्रामसेवक गोपीचंद दादा गवळी आणि वसुली अधिकारी मोहम्मद कचरुद्दीन पठाण यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने या तिघानाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. (10 years imprisonment for corrupt sarpanch, gram sevak)  तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांना दहा वर्षे कारावास आणि चार हजार रुपये दंड तर वसुली अधिकारी पठाण याला पाच वर्षे कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.  सोलापूर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायधीश आर. एन. पांढरे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !