BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जाने, २०२३

निलंबित शिक्षणाधिकारी यांच्याकडे पन्नास कोटीहून अधिक मालमत्ता !


शोध न्यूज : लाचखोरीत अडकलेल्या सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे पन्नास कोटींहून अधिक मालमत्ता आढळली असून त्यांची ही ९ वर्षातील कमाई असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. 


सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले होते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली होती. कडक शिस्तीचे म्हणून गणले गेलेले शिक्षणाधिकारी लोहार हे वादग्रस्त अधिकारी म्हणून देखील समोर आले होते. लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्या एकेक कथा सुरसपणे सांगितल्या जाऊ लागल्या होत्या शिवाय त्यांच्या मालमत्तेची चर्चा देखील होत होती. लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर किरण लोहार यांची मालमत्ता तपासण्याचे काम सुरु झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या मालमत्तेची माहिती मिळविण्याचे आणि चौकशी करण्याचे काम सुरु केले होते. 


किरण लोहार यांची खुली चौकशी देखील सुरु करण्यात आली होती आणि आता ही चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या आठवड्यात देखील त्यांना बोलावून त्यांची अधिक चौकशी अधिकाऱ्यांनी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाकडून जागा, जमीन यांचे दस्त प्राप्त करून घेतले असून त्यांच्या खात्यात ३० लाखांची रक्कम आढळून आली होती. चौकशीत लोहार यांच्याकडे कोट्यावधी रुपयांच्या दागिन्यांच्या पावत्या निदर्शनास आल्या होत्या. ९ वर्षांच्या शासकीय सेवेत त्यांच्याकडे ५० कोटींपेक्षा अधिक रकमेची मालमत्ता आढळून आली असून या संपत्तीचा तपास सद्या सुरु आहे. अल्पकाळातील सेवेत त्यांच्याकडे एवढी मोठी मालमत्ता कशी जमा झाली हा एक प्रश्न असून याची सखोल चौकशी करण्यात येवू लागली आहे. ही संपत्ती गैरमार्गाची आढळून आल्यास त्यांच्याविरोधात "अपसंपदा" अंतर्गत कारवाई होऊ शकते. 


दरम्यान आठ दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांना देखील लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यांच्याही घराची झडती घेण्यात आली असून लॉकरमध्ये दहा तोळे सोन्याचे दागिने आढळून आलेले आहेत. त्यांचे एक प्रशस्त घर मुंबई येथे असून अन्य ठिकाणी आणखी मालमत्ता आहे काय ? याबाबत खुली चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून चौकशी करण्यात येत असून त्यांची खुली चौकशी सुरु करण्यात आली आहे.


साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटचे ‘कन्सेंट टू ऑपरेट’ लायसन्स नूतनीकरण करण्यास मदत केल्याबद्धल मोबदला म्हणून तसेच हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबतकारखान्याबाबत आलेल्या तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आलेली होती. (Assets worth crores with the suspended education officer) या शिवाय प्रस्तावित फार्मास्यूटिकल्स युनिटचे 'कन्सेंट्‌स टू इस्टॅब्लिश' परवान्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी  दोन लाखांची लाच मागितली होती. सदर लाच स्वीकारताना पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले होते आणि त्यांच्याविरोधात सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !