गोष्ट छोटी ... डोंगराएवढी ..!
शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यात ऊसाच्या फडात एक आगळी वेगळी संवेदना फुलून गेल्याचा अनुभव आला असून संवेदनशील मनाच्या एका पत्रकाराने ऊसाच्या फडात मायेचे पांघरून दिल्याने गरीब मजूर आणि त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर पसन्न हास्य फुलवले.
माणसाने नेहमी इतरांच्या उपयोगाला पडावे असे सगळेच सांगतात पण यातील किती जण प्रत्यक्षात इतरांसाठी काही करण्याचे मोठेपण आणि मोठे मन दाखवतात हे समाजात पाहायला मिळत असते. अनेक दानशूर मंडळी तीर्थक्षेत्री जाऊन सोन्यानाण्याचे आणि रोख रकमेचे मोठे दान करतात तर काहीजण हे दान केल्याचे दाखवताना आपलीच प्रसिद्धी करून घेतात. कुणी दहा पाच लोकांना अन्नदान करतात आणि शेकडो लोकांना जेवण दिल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करतात. परंतु संवेदनशील मन असले की छोटे वाटणारे दानही किती मोठे ठरते हे ऊसाच्या फडातील मजुरांच्या लेकरांच्या चेहऱ्यावरील पसन्न हास्याने दिसून आले. सकाळची प्रसन्नता आणि काळजात भरलेला आनंद ऊस तोडणी मजूर आणि त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर चांदण्यासारखा खळखळताना पाहायला मिळाला आहे.
हल्ली प्रत्येकाच्याच घरात जुन्या कपड्याचा ढीग पडलेला असतो, सतत नवे कपडे घरात येतात आणि चांगल्या अवस्थेतील जुने कपडे अडगळीला पडतात. एकीकडे अडगळीला कपड्यांचा ढीग पडलेला असतो तर दुसरीकडे अंगावर फाटके कपडे दागिन्यासारखे मिरवत गरीब कष्ट करीत असतो. ही वेदना जाणवण्यासाठी संवेदनशील मनांची गरज असते. पंढरपूर येथील पत्रकार सुनील उंबरे यांची संवेदना अशीच व्यक्त झाली आहे. त्यांनी आपल्या घरातील जुने परंतु चांगल्या अवस्थेतील कपडे एका भल्या मोठ्या बॉक्समध्ये भरले आणि थेट उसाचा फड गाठला. थंडीवाऱ्याचे दिवस असून फाटक्या कपड्यावर मजूर दिनरात्र ऊसाची तोडणी करीत असतात आणि त्यांची लहान लेकरं ऊसाच्या फडात आजूबाजूला खेळत असतात. त्यांच्या अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झाल्या तरी त्याकडे पहिले जात नाही, सुनील उंबरे यांची नजर मात्र या लेकारांपर्यंत गेली आणि त्यांनी कपडे घेवून ऊसाचा फड गाठला.
ऊसाच्या फडत जाऊन त्यांनी कपड्यांचा बॉक्स उघडला आणि मजुरांसह त्यांच्या लेकरांना साद घातली. कुणीतरी आपल्यासाठी कपडे घेवून आले आहे म्हटल्यावर मजुरांच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरले तर त्यांची लेकरं धावत धावत या कपड्यांच्या बॉक्सजवळ आली. सुनील उंबरे यांनी आवश्यकतेनुसार त्यांच्या हाती कपडे द्यायला सुरुवात केली तेंव्हा हे चांगले कपडे हातात घेतलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदणं फुलून गेलं. मोठ्या कौतूकानं ही लेकरं या कपड्यांकडे पाहून आनंदली तर फाटक्या कपड्यावर ऊस तोडणाऱ्या महिला आणि पुरुष मनोमन सुखावलेले दिसत होते. तीर्थक्षेत्री जाऊन लाखो, करोडो रुपयांचे सोने नाणे दान करण्यापेक्षा संवेदनशील मनाने सुनील उंबरे यांनी केलेले हे काम कितीतरी मोठे वाटून गेले.
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्यासाठीची ठेकेदार शंकर काळे यांच्याकडील ऊस तोड टोळी फडात उसतोड करीत असताना तेथे जाऊन या मजुरांची आणि त्यांच्या लहान लेकरांची संक्रांतच गोड करण्यात झाली त्यामुळे सुनील उंबरे यांच्या या उपक्रमाचे कौतुक कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे तसेच कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले तसेच उंबरे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाळवणी वाहन विभागाचे गटप्रमुख बंडू पवार, चिटबॉय शंकर रणदिवे उपस्थित होते.
माझा दर वर्षीचा हा उपक्रम आहे आपल्या कपाटात अनेक कपडे असे असतात की नुसती इस्त्री आणि गंजी करुन पडून असतात नवनवे कपडे खरेदी केले की पूर्वीचे कपडे अडगळीत जातात. असे कपडे गरजू लोकांना द्यावेत हा माझा अट्टाहास असतो नदीच्या घाटावरील भिकारी आता माजुर्डे झालेत नवे कपडे दिले तरी ते घालत नाहीत विकून टाकतात म्हणून मी ऊस तोडणी कामगार हा पर्याय निवडला आहे. कुठल्याही एका ऊस फडावर जाऊन या लोकांना एकत्र गोळा करायचे आणि आपले कपडे, साड्या वाटून टाकायच्याहे कपडे पाहून खूप खुश होतात हे लोक अतिशय गरीब परिस्थिती असते या मजुरांची काबाडकष्ट करतात अशी होतकरू लोकांना मदत केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि आनंद आपल्या मनाला सुखावणारा असतो त्यासाठी हा प्रपंच...!
- सुनील उंबरे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !