शोध न्यूज : एका अल्पवयीन मुलीला चिट्ठी देत मोबाईल नंबर देणे एका प्रेमवीराला भलतेच महागात पडले असून न्यायालयाने त्याला दोन कलमानुसार तब्बल सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात आणि रस्त्यावर अनेक सडकछाप प्रेमवीर वावरत असतात आणि शाळकरी मुलीना उद्देशून काही शेरेबाजी करीत असतात, अप्रत्यक्ष छेडछाड करीत असतात तर कधी मुलीना आपले फोन नंबर देत सलगी साधण्याचा प्रयत्न करीत असतात. परिणामाची जाणीव न ठेवता असे प्रकार केले जातात परंतु अशा एका प्रेमवीराला न्यायालयाने थेट सहा महिन्यांची शिक्षा सुनावली असल्याने आता इतरांनी देखील सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. एका अल्पवयीन मुलीला एक चिट्ठी देत त्यावर आपला मोबाईल क्रमांक दिल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
पिडीत मुलगी आपल्या घरी असताना पावन त्र्यंबक इंगळे या अकोल्याच्या तरुणाने तिला एक चिट्ठी दिली आणि यावर आपला मोबाईल क्रमांक लिहिला होता. त्या क्रमांकावर फोन करण्यास या तरुणाने सांगितले होते. पिडीत मुलीवर त्याची वाईट नजर होतीच. (Molestation of minor girl, youth sentenced to six years) या मुलीने त्याला फोन करण्याऐवजी थेट आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर आईने थेट त्याचेच घर गाठले आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हा तरुण समजावून घेण्याच्या मनस्थितीत तर नव्हताच पण त्याने मुलीच्या आईलाच दमदाटी आणि शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे या आईला पोलीस ठाणे गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मुलीने आणि आईने पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी सदर प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात झाली आणि या प्रकरणी तरुणाला दोषी धरण्यात आले. न्यायालयाने त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड संहिता ३५४ अन्वये त्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड तर पोक्सो कलम ११ आणि १२ नुसार तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही कलमात प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड न भरल्यास आणखी प्रत्येकी एक महिना साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे. दोन्ही कलमात मिळून सहा वर्षांची शिक्षा झाली असली तरी या दोन्ही शिका एकाचवेळी भोगायच्या आहेत. अल्पवयीन मुलीवर एकतर्फी केलेले प्रेम त्याला भलतेच महागात पडले असून इतरांसाठी देखील हा फार मोठा 'धडा' ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !