BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जाने, २०२३

भर रस्त्यावर आईवर हल्ला करून तरुण मुलीला पळवले !

 



शोध न्यूज : भर रस्त्यावर आईवर प्राणघातक हल्ला करून तरुण मुलीला पळवून नेण्याची अत्यंत धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक घटना आज पंढरपूर तालुक्यात घडली आहे. 


महिला आणि मुली सुरक्षित नसल्याच्या अनेक  घटना सतत आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अनेक अल्पवयीन मुलींचे अपहरण होत आहे तर फूस लावून मुलीला पळवून नेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. अशा घटना वाढीला लागल्याने पालक चिंतेत असून तरुण मुलीला एकटे सोडायला पालक तयार नसतात पण आज मुलीच्या आईच्या डोळ्यादेखत आणि आईवर शस्त्राने हल्ला करून तरुण मुलीला पळवून नेण्याची अत्यंत धक्कादायक घटना पंढरपूर शहराच्या जवळ घडली आहे.  पंढरपूर तालुक्यातील कोर्टी - टाकळी बायपास रस्त्यावर आज भरदिवसा ही थरारक घटना घडली आहे. 


याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून त्यानुसार  कोर्टी रस्त्यावर असलेल्या सिंहगड या शैक्षणिक संस्थेत सेवेत कार्यरत असलेल्या एक महिला आज दुपारी आपली २१ वर्षे वयाची मुलीसोबत त्या निघाल्या होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात परीक्षा असल्यामुळे या दोघी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. यावेळी पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील सागर घाडगे हा आपल्या एका मित्रासह तेथे आला, त्याच्या हातात धारदार शस्त्र होते.  हातात शस्त्र घेत त्याने आई आणि मुलीला शिवीगाळ सुरु केली आणि आईवर शस्त्राने हल्ला केला. जोरदार झालेल्या हल्ल्यामुळे आई जखमी झाली आणि ही संधी साधून तिच्या २१ वर्षीय मुलीला पळवून नेण्यात आले. 


या प्रकरणाला काही इतिहासही असल्याचे सांगितले गेले असून मागील सहा महिन्यांपूर्वी या मुलीला सदर आरोपीने पळवून नेले होते आणि त्यांनी लग्न केले असल्याचेही सांगितले होते. आज मात्र थेट आईवर हल्ला चढवत त्या मुलीला पळवून नेण्यात आले असून पोलीस आता मुलीसह सदर आरोपींचा शोध घेत आहेत. (Kidnapping of young girl after attacking her mother on the street) भरदिवसा भर रस्त्यावर अशी घटना घडल्याने तरुण मुली आणि त्यांच्या पालकात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारची घटना ही पंढरपूर तालुक्यात पहिल्यांदाच घडली असावी परंतु या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !