BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२३

महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील केदार यांना शिक्षा ! अभियंत्यांना केली होती मारहाण !!

 



शोध न्यूज : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सुनील केदार यांना सरकारी कर्मचाऱ्यास केलेली मारहाण चांगलीच भोवली असून केदार यांना न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 


लोकप्रतिनिधीना शिक्षा होण्याचे प्रमाण अलीकडे वाढू लागले असून नुकतीच राष्ट्रवादीचे खासदार आणि शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या मोहम्मद फैजल यांना खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याआधी आणखी काही आमदार, माजी आमदार, माजी मंत्री यांना न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावलेली आहे. केंद्रातील माजी मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना तर जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. नेत्यांना होत असलेल्या शिक्षेबाबत चर्चा होऊ लागली असताना आज शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 


कोराडी ते तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वाहिनीचे काम करीत असलेल्या महापारेषण च्या अभियंत्यास मारहाण केल्याच्या आरोपात जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर याना मारहाण केल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता. केदार यांच्यावर शासकीय कामात अडथळा करून लोकसेवकास मारहाण केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला होता.  ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अति उच्च दाबाची विजेची वाहिनी टाकण्याचे काम सुरु होते. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या होत्या. या कामाच्या निमित्ताने सहायक अभियंता खुबाळकर हे अन्य तीन अधिकारी यांच्यासोबत तेलगाव येथे पिकांच्या भरपाईबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करीत असताना आमदार सुनील केदार आपल्या वीस कार्यकर्त्यांसह तेथे गेले होते. 


'येथे काम सुरु करण्यासाठी परवानगी कुणी दिली ?' असा जाब विचारत केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य चार जणांनी महावितरणचे अभियंता खुबाळकर आणि ठेकेदाराच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. शिवाय 'येथे पुन्हा काम कराल तर तुमचे तुकडे तुकडे करून घरी पाठवून देऊ' अशी धमकी देण्यात आली असा आरोप आमदार सुनील केदार यांच्यावर होता. याप्रकरणी केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. (Ex-minister Sunil Kedar sentenced in court, government employee beaten up) या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र  न्यायालयात झाली आणि न्यायालयाने सुनील केदार याना या प्रकरणी दोष ठरवले. साक्षीदार आणि पुरावे तपासून नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार याना एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !