लक्षवेध, पुन्हा एकदा !!
शोध न्यूज : चोरट्या वाळूचा धुमाकूळ सुरूच असून पोलिसांनी आता पुन्हा एकदा अकरा गाढवांना ताब्यात घेतले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रातून या गाढवांच्या मदतीने वाळूची चोरी सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वाळूचोर काही केल्या शांत बसायला तयार नसून कितीही कारवाया केल्या तरी देखील वाळूचोरी केली जात आहे. पोलीस आणि महसूल विभागाने आजवर विविध कारवाया केल्या आहेत. वाळू उपसा करणाऱ्या बोटी फोडल्या आहेत, वाळूचोरी करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत, शिवाय काही टोळ्या हद्दपार देखील केल्या आहेत तरीही या चोऱ्या कशा होत राहतात हा देखील एक चर्चेचा विषय बनू लागला आहे. वाळूचोर कायद्याला जुमानत नाहीत असे अनेकदा दिसून येते आणि सर्रास वाळूची चोरी खुलेआम सुरु असते. वाहनांतून वाळू वाहतूक होतच असते पण गाढवाच्या सहाय्याने नदीतील वाळू वाहतूक करून एका ठिकाणी जमा केली जाते आणि तेथून ती मोठ्या वाहनातून विक्रीसाठी रवाना केली जाते. पोलिसांची मर्यादित संख्या आणि वाढती गुन्हेगारी यामुळे पोलिसावर आधीच मोठा ताण पडत असताना आता गाढवांना देखील ताब्यात घेण्याची वेळ पोलिसांवर येत आहे. अशा प्रकारच्या कारवाया आधीही झाल्या आहेत आणि आता पुन्हा पंढरपूर पोलिसांनी १४ गाढवांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत असताना कबीर घाटाच्या परिसरात चंद्रभागा नदीतून वाळू उपसा आणि वाहतूक सुरु असल्याचे पोलिसांना दिसून आले. गाढवांच्या पाठीवर वाळूची पोती टाकून ते घेवून जात असताना एक व्यक्ती पोलिसांना दिसून आला. त्यालाही पोलिसांचा सुगावा लागला आणि गाढव सोडून तो अंधाराचा फायदा घेत पळून गेला. १४ गाढवांच्या खांद्यावर वाळूची १४ पोटी असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ही चोरटी वाळू आणि १४ गाढवांना ताब्यात घेतले आहे. (Donkey seized by police while transporting stolen sand) चार पाच दिवसांपूर्वीच पोलिसांना वाळूची चोरटी वाहतूक करणारी ६ गाढवे आढळून आली होती, त्यानाही ताब्यात घेण्यात आले होते आणि आता पुन्हा १४ गाढवांना ताब्यात घेण्याची वेळ पोलिसांवर आली. वेगवेगळ्या प्रकारे वाळूची चोरी होत असतानाच गाढवावरून वाळू वाहतूक करण्याचा प्रकार आधीपासून आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !