शोध न्यूज : अठरा लाख रुपये खर्च करून तयार केलेला रस्ताच चोरीला गेला असून अधिकारी आता रस्त्याचा शोध घेत आहेत तर हा रस्ता शोधून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
'जाऊ तेथे खाऊ' या चित्रपटात विहीर चोरी गेल्याचे एक प्रकरण दाखवले असून प्रशासनातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश अत्यंत सुंदर पद्धतीने करण्यात आला आहे. विहिरी चोरीस गेल्याच्या अनेक घटना गावागावातून समोर देखील आलेल्या आहेत पण आता गावाचा रस्ता चोरीला गेल्याचे एक प्रकरण गाजू लागले असून या रस्त्याचा शोध अधिकारीही घेत आहेत. प्रशासनातील काही अधिकारी केवळ कागदावर सगळे काही उरकतात आणि शासनाच्या तिजोरीतील रक्कम आपल्या तिजोरीत भरतात. कागदोपत्री सगळे काही दिसते पण प्रत्यक्षात ते कुठेच नसते असे अनेक प्रकार उघडकीस येतात पण उघड न झालेले अनेक प्रकार तसेच अंधारात राहतात. "तेरी भी चूप, मेरी भी चूप" अशा पद्धतीने सगळे काही चालते आणि हे सगळ्यांना माहितही असते. असाच काहीसा प्रकार एका रस्त्याच्या बाबतीत घडला असून हे प्रकरण भलतेच चर्चेचे ठरले आहे.
मालेगाव तालुक्यातील टोकडे गावासाठी तब्बल अठरा लाख रुपये खर्च करून एक रस्ता तयार करण्यात आला होता अशी नोंद कागदावर आहे पण प्रत्यक्षात हा रस्ता कुठेही दिसत नाही. कागदावर रस्ता दिसतो आहे, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला आहे पण हा रस्ता दिसतही नाही आणि शोधून सापडतही नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. साहजिकच याची चर्चा नाशिक जिल्हाभर सुरु आहे. रस्ता गायब असल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि एका पथकाने सगळीकडे पायी फिरून या रस्त्याचा शोध घेतला पण त्यांना तो कुठेच सापडला नाही. अखेर हतबल होऊन हे पथक परत गेले. या रस्ता चोरीच्या प्रकरणाची तक्रार आता पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात हा रस्ता तयार करण्यात आला होता आणि यासाठी १८ लाखांचा खर्च देखील केला गेला होता. अवघ्या एका वर्षात हा रस्ताच चोरीला गेला आहे.
कागदावर दिसणारा रस्ता प्रत्यक्षात दिसत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्याने मालेगाव पोलीस ठाण्यात रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. अधिकारी धावत पळत हा रस्ता पाहण्यासाठी गेले, त्यांनी बरीच पायपीट केली पण त्यांना या रस्त्याचा शोध काही लागला नाही. शोध पथकाच्या हाती काहीच न लागल्याने हा रस्ता गेला तरी कुठे ? असा प्रश्न आता अधिकारी मंडळीनाही पडला आहे. प्रशासकीय अधिकारी मंडळीना हा रस्ता सापडला नाही आणि गावकरी मंडळीना हा रस्ता दिसलाच नाही त्यामुळे या गौडबंगालची मोठी चर्चा होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे विचारणा करून फार काही हाती लागणार नाही याची जाणीव असल्याने त्यांनी थेट पोलीस ठाण्यातच रस्ता चोरीची तक्रार दिली.
पोलीस ठाण्यात रस्ता चोरीची तक्रार दाखल झाल्यावर प्रशासकीय अधिकारी यांनी रानमाळ पायाखाली घातले आहे पण त्यांना या रस्त्याचा कुठेच मागमूस लागलेला नाही त्यामुळे त्यांनीही कपाळावर हात मारून घेतला आहे. आधी याच तक्रारदार कार्यकर्त्याने हा रस्ता शोधून देणाऱ्या व्यक्तीस एक लाखाचे बक्षीस घोषित केले होते. त्यानंतर दोन लाख आणि आता पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस मिळविण्यासाठी मात्र कुणीच पुढे येताना दिसत नाही कारण काही केल्या हा रस्ता सापडू शकत नसल्याची जाणीव आता सगळ्यांनाच झाली आहे. प्रशासनाचे पथक दिवसरात्र हा रस्ता शोधून थकले आहे पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही त्यामुळे हा रस्ता केवळ कागदावरच तयार झाल्याची जाणीव प्रशासनालाही झाली आहे. यातील काही अधिकारी मंडळीना मात्र हा रस्ता कागदावर कसा तयार झाला याची माहिती असण्याचीही शक्यता आहे.
प्रशासकीय अधिकारी मंडळीनी रस्ता तयार झाल्याची तपासणी केल्याशिवाय अठरा लाखांचा शासकीय खर्च केला काय ? रस्ता कागदावरच, तपासणी कागदावरच आणि रक्कम मात्र कुणाच्या तरी खात्यात आणि कुणाच्या तरी खिशात असाच हा प्रकार घडला असण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे. (Complaint to the police that the road was stolen, the administration is in trouble) पोलिसांच्या समोर मात्र रस्ता शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे आणि प्रशासकीय यंत्रणेला घाम फुटला आहे. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जाणार नाही म्हणून हे प्रकरण थेट सीबीआय कडे देण्याची मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगू लागले आहेत त्यामुळे तर प्रशासनाची मोठी कोंडी होऊ लागली आहे. गावकरी मात्र डोळे विस्फारून या सगळ्या प्रकरणाकडे पाहू लागले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !