शोध न्यूज : सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पोलीस वसाहतीत मोठा स्फोट झाला असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र कुणालाही समजू शकले नाही.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीत पाडकाम सुरु आहे. जुने बांधकाम पाडून नवे बांधकाम करण्यात येत आहे. या ठिकाणी काम सुरु असताना अचानकपणे एका इमारतीच्या खिडकीच्या जवळ मोठा स्फोट झाला. या स्फोटाची शक्ती आणि आवाज देखील मोठा होता. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही . दक्षिण बाजूला जेसीबी आणि पोकलेन मशीन होती तर उत्तर बाजूला हा स्फोट झाला. या स्फोटामुळे जिन्याची सिमेंटची अवजड तावदाने देखील दीडशे फूट अंतर दूर फेकली गेली. परिसरातील घरांवर आणि दुकानावर तसेच जवळच असलेल्या भारत संचार निगम कार्यालयावर लहान दगडगोटे उडून पडले.
अचानक झालेल्या या स्फोटाच्या घटनेने परिसरात एकदम घबराट निर्माण झाली. मोठा आवाज झाल्याने नागरिकांचे लक्ष आवाजाच्या दिशेने वेधले गेले. स्फोटाबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी तातडीने येथे धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासाठी आवाहन केले. सायकर यांनी लगेच सोलापूर बॉम्ब शोधक पथकाला देखील पाचारण केले. डॉग स्कॉड देखील बोलाविण्यात आले. या पथकांनी घटनास्थळी पाहणी आणि तपासणी केली परंतु हा स्फोट नेमका कशाचा आणि कशामुळे झाला याची काहीच माहिती त्यांना समजू शकली नाही.
सदरची घटना घडताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी तातडीने चौकशी करून माहिती घेतली तर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटात औषधाच्या जुन्या बाटल्यांचा वापर झाल्याचे दिसून आले आहे. (Blast in old police colony on Solapur-Pune road) फटाक्यांच्या दारूकामासाठी वापरल्या जाणाऱ्या दारूसारखा वास या बाटल्यांचा येत आहे. या घटनेबाबत बारकाईने पाहणी करण्यात आली असून स्फोटाचे नेमके कारण मात्र त्यांनाही समजले नाही. या घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !