शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांनाही सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पुण्याच्या चिंचवड येथे तीन दिवसांपूर्वी पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे राज्यभर पडसाद उमटले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक विधान केले होते तर भारतीय जनता पक्षाच्या अन्य काही नेत्यांनीही थोर युगपुरुषांच्या बाबत अशीच विधाने केली होती त्यामुळे राज्यात संताप व्यक्त होत असताना आणि आंदोलने सुरु असताना चंद्रकांत पाटील यांच्याही विधानावर आक्षेप घेण्यात आला होता.
आधी आक्रमक भूमिका घेत विधानावर ठाम राहिलेल्या पाटील यांनी नंतर याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती परंतु त्यानंतरही चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आणि पुन्हा एकदा हा विषय अधिक चर्चेचा आणि वादाचा ठरला होता. समता सैनिक दलाचे संघटक मनोज भास्कर गरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज तसेच वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आली.
भाजपाकडून या घटनेचा निषेध केला जात असताना राज्यात शाईफेक प्रकरणाचे पडसाद उमटत होते. शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे यांना बक्षीस घोषित करण्यात आले परंतु पोलिसांनी या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम लावल्यामुळे पुन्हा गरबडे यांना सहानुभूती मिळू लागली तर भाजपला टीका सहन करावी लागली. शाई फेकली म्हणून हत्या करण्याचा प्रयत्न कसा होऊ शकतो असा सवाल विचारला जाऊ लागला. शाई फेकून मारल्याने कुणी मरु कसे शकते ? असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला होता. अखेर हे कलम मागे घ्यावे लागले तसेच याप्रकरणी पोलिसांचे करण्यात आलेले निलंबन देखील मागे घेण्याचे आदेश काढण्यात आले.
शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोज गरबडे आणि अन्य तिघांना पुण्याच्या सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. (Bail to Manoj Garbade who threw ink on ministers) या तिघांना जामीन मिळाल्याने गरबडे समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !