BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ डिसें, २०२२

--- म्हणून शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी !



शोध न्यूज : राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा आलेल्या धमकीचा तपास लागला असून आपल्या पत्नीवर कारवाई होत नसल्याने त्याने थेट शरद पवार यांनाच मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. 


माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना यापूर्वीही धमक्या देण्यात आल्या आहेत आणि पवार हे अशा धमक्यांना भीक घालत नाहीत हे देखील दिसून आले आहे. पवार यांना आता पुन्हा एक धमकी आली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी फोन करून त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली त्यामुळे पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क झाली, पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आणि अखेर या व्यक्तीचा शोध पोलिसांना लागला आहे.  धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून ताब्यात घेण्यात आले असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. 


शरद पवार यांना धमकी देणारा नेमका कोण ? त्याने पवार यांना कशासाठी धमकी दिली ? असे काही प्रश्न कालपासून उपस्थित केले जात होते. सदर धमकीबाबत पवार यांनी मुंबई पोलिसात तक्रारही दाखल केलेली होती शिवाय पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतले होते. गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांनी कर्नाटक - महाराष्ट्र सीमावादावर आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे ही धमकी आली असावी असा कयास लावण्यात येत होता. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनाही अलीकडेच धमकी आलेली होती. ही धमकी सीमावादातून आल्याचे सांगण्यात आले होते. 

धमकी देणाऱ्या व्यक्तीस बिहार येथून अटक करण्यात आली असून धमकी देण्याचे कारण समोर आले आहे. धमकी देणारा हा माथेफिरू असल्याचे कालच सांगण्यात येत होते. त्याच्या पत्नीने दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न केले आहे, तिच्यावर कारवाई न झाल्याने या व्यक्तीने पवार यांनाच धमकी दिल्याचे कारण समोर आले आहे. (Sharad Pawar threatened to take action against his wife) असे असले तरी पोलीस खोलात जाऊन या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.


 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !