शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील करकंब परिसरात उजनी कालव्यात ट्रॅक्टर कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे.
कुर्डूवाडी- पंढरपूर रस्त्यावर आष्टीजवळ कालव्यात कार कोसळून एका लावणी कलावतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना आता पुन्हा उजनीच्या कालव्यात ट्रॅक्टर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ऊसाची तोड करणाऱ्या मजुरांना उसाच्या दुसऱ्या फडात घेवून निघालेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्यात ही दुर्घटना घडली आहे. काल १३ डिसेंबरच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी मजुरांना घेवून जात असताना ट्रॅक्टर उजनीच्या कालव्यात कोसळला. भरधाव वेगात निघालेला हा ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट कालव्यात कोसळला. यात तीन मजूर महिला आणि दोन लहान मुले यांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या मोठ्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना मदत केली. रात्रीच्या वेळी हा अपघात झाल्यानंतर मोठा आरडाओरडा झाला. यावेळी परीसातील लोक धावून आले. पोलिसांनीही वेळेत धाव घेतली. (Fatal accident near Pandharpur, five dead) अपघातातील मजूर हे मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात पाच मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून (एम एच ४५ एस ११८३) हे मजूर ते राहत असलेल्या मदने वस्तीकडे निघाले होते यावेळी बागवान वस्तीजवळ उजनीच्या डाव्या कालव्याच्या फाट्यात ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. ट्रॉली पलटी होऊन त्याखाली कामगार अडकले आणि यात काही कामगार मृत्युमुखी पडले.
- या अपघातात तीन महिला आणि केवळ २ वर्षे वयाची दोन मुले मृत्युमुखी पडली आहेत. दोन मायलेकरांचा मृत्यू या घटनेत झाला असून ट्रॅक्टर चालकाविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गळीत हंगाम सुरु झाला की ट्रॅक्टरमुळे होणाऱ्या अपघातात एकदम वाढ होते हा दरवर्षीचा अनुभव आहे. वाहतुकीचे सगळे नियम पायदळी तुडवत ट्रॅक्टरचालक रस्त्यावरून धावत सुटलेले असतात तसेच कुठेही, कसेही उभे केले जातात. कधी ट्रॅक्टर कुणाला धडकतो तर कधी उभ्या ट्रॅक्टरवर वाहने आदळून प्राण जातात. दरवर्षी हे प्रकार घडत असतात परंतु प्रादेशिक परिवहन विभाग मात्र अपेक्षित कारवाई करताना दिसत नाही. राज्यात सगळीकडे अशा अपघातात वाढ झालेली असते आणि यावर्षीही आजवर अनेक अपघातांची नोंद झाली आहे. पोटासाठी परराज्यातून आलेल्या ऊस तोड मजूर महिला आणि लहान मुलांना प्राण घामावावे लागल्याची घटना आता पुन्हा एकदा घडली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !