शोध न्यूज : धाड धाड करीत प्रचंड वेगाने धावणारी आणि थांब्याशिवाय मध्ये कुठेही न थांबणारी रेल्वे माणुसकीने ओथंबली आणि एका गर्भवती महिलेसाठी थांबा नसतानाही थांबली !
भारतीय रेल्वेच्या सुसाट धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या अकारण सेकंदाचाही वेळ कुठे न दवडता अखंड धावत असतात. अनेक एक्सप्रेसला तर मोठ्या स्थानकावर देखील थांबा नसतो त्यामुळे अशा स्थानकावरून देखील धावत निघून जात असतात. पण थांबा नसलेली एक एक्स्प्रेस सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर मानवतेच्या भूमिकेतून थांबली आणि या मानवतेने एका गर्भवती महिलेला मोलाची मदत केली. रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे एका महिलेसाठी थांबा नसतानाही रेल्वे एक्सप्रेस अर्ध्या रस्त्यावर थांबली आणि गर्भवती महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
राजकोट एक्सप्रेस मधून प्रवास करणारी हैद्राबाद येथील रंजनीदेवी महांतो ही महिला प्रवास करीत होती. सदर महिला गर्भवती होती आणि प्रवासाच्या दरम्यान या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. प्रवासात या महिलेला मोठा त्रास होऊ लागला आणि याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. राजकोट एक्सप्रेस ही कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर थांबत नाही, पुढे ती थेट सोलापूर येथेच थांबते आणि महिलेला होणाऱ्या वेदना या अधिक त्रासदायक होत्या. सोलापूरला पोहोचायला आणखी बराच वेळ होता त्यामुळे रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या आणि सदर रेल्वे कुर्डूवाडी स्थानकावरच थांबेल अशी व्यवस्था केली.
कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर अखेर ही एक्सप्रेस थांबली आणि तातडीने या गर्भवती महिलेस कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, येथे या महिलेने एक गोड आणि गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान ही रेल्वे तब्बल पंधरा मिनिटे कुर्डूवाडी येथेच थांबून राहिली. रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या मानवतेमुळे एक आगळी वेगळी घटना घडून आली. (Railway express stopped for a woman too) रंजनीदेवी आणि त्यांच्या पतीने पोलिसांना मनापासून धन्यवाद दिलेच पण अन्य प्रवाशांनी देखील रेल्वे पोलिसांच्या माणुसकीचे तोंडभरून कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !