BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ डिसें, २०२२

राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी आमदार राजू तोडसाम यांना सक्तमजुरी !

 


शोध  न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असून राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.  


राजकीय क्षेत्रात अनेक आंदोलने होतात पण काही आंदोलने ही भलतीच महागात पडतात. आजवर अनेक नेत्यांना अशा आंदोलनामुळे तुरुंगाची हवा खावी लागली असून आता यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तब्बल तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यासह राष्ट्रवादी कार्यकर्त्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Senior NCP leader and former MLA Raju Todsam sentenced) पांढरकवडा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या शिक्षेच्या विरुद्ध ते वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीत २९ नोव्हेंबर २०१३ रोजी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. तोडसाम आणि  त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड आणि जाळपोळ केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी होऊन माजी आमदार राजू तोडसाम आणि त्यांचे पाच सहकारी यांना या खटल्यात न्यायालयाने दोषी धरले असून एकूण सहा जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने माजी आमदार तोडसाम यांच्यासह नंदकिशोर पंडित, किशोर घाटोळ, विकेश देशटीवार, सुधीर ठाकरे, नारायण भानारकर या सर्वाना तीन वर्षे सक्तमजुरी आणि बारा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.  


कापसाचा लिलाव सुरु असताना माजी आमदार राजू तोडसाम यांनी, कापसाला भाव दिला जात नाही, वजन करताना काटा मारला जातो असा आरोप करीत कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळ घातला होता. यावेळी इमारतीची तोडफोड करून पेट्रोल टाकून इमारतीला आग लावली असा आरोप त्यांच्यावर होता. या तोडफोडीत आणि आगीत बाजार समितीच्या खुर्च्या, भिंतीवरचे पंखे, एलईडी स्क्रीन यासह ३ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या सामानाचे नुकसान झाले होते. तर १ लाख १२ हजार रुपयाचे सामान चोरून नेले होते असा आरोपही होता. या खटल्यातून संशयाचा फायदा घेत गिरीश वैद्य, संजय वर्मा, सुभाष दरणे आणि सुनील बोकीलवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अन्य सहा जणांना मात्र शिक्षा सुनावण्यात आली आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !