BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ डिसें, २०२२

"लग्न होईना, कुणी मुली देईना" म्हणत अविवाहित तरुणांनी काढला मोर्चा !

 


शोध न्यूज : 'मुलगी द्या हो मज पामराला' अशी मागणी करीत लग्नासाठी मुलगी पाहिजे म्हणून सोलापुरात आज चक्क अविवाहित तरुणांनी मोर्चा काढला आणि एका अत्यंत ज्वलंत समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. 


पारंपारिक आंदोलने होतात परंतु या आंदोलनाची फारशी दखल घेतली जात नाही. मोर्चे, उपोषणे अलीकडे निष्प्रभ ठरू लागल्याने आंदोलक आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या आणि अभिनव अशा कल्पना राबवतात. वेगळी संकल्पना पुढे आली की त्या आंदोलनाकडे आणि त्यांच्या मागण्याकडेही लक्ष जाते त्यामुळे आज सोलापुरात 'कुणी मुली देईना, लग्न होत नाही' याकडे लक्ष वेधत अविवाहित तरुणांनी चक्क नवरदेवाचा पोषाख परिधान करून घोड्यावरून मोर्चा काढला. गेल्या काही वर्षांपासून तरुण मुलांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. या समस्येमुळे अनेक तरुण मुलांची लग्नं रखडली आहेत आणि कित्येकांचे वय देखील उलटून जाताना दिसत आहे. ही एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली असून ज्योती क्रांती संघटनेने हा मोर्चा काढून लग्नासाठी मुली देण्याची मागणी केली आणि या मोर्चाची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. 


विविध समस्या आणि मागण्या यासाठी मोर्चे निघतात पण या मोर्चाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एकाच वेळी अनेक नवरदेव मोर्चाने असे कुठे निघाले असा प्रश्न देखील अनेकांना पडला. अनेकजण बुचकळ्यात पडले तर अनेकजण चौकशी करीत राहिले. हे नवरदेव घोड्यावर बसून थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले.   'कोणी मुलीगी देता का मुलगी लग्नासाठी या पामराला', 'बेटी बचाओ', अशा मजकुराचे फलक हातात घेवून, बाशिंग बांधून, नवरदेवाचे वेशात घोड्यावर स्वार होऊन हे तरुण मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. मोर्चाच्या मागण्या या वरवर गंमतशीर वाटत असल्या तरी हेतू अत्यंत महत्वाचा आणि तितकाच विचार करायला लावणारा आहे.


तरुण मुलाचे वय ४० वर्षांचे झाले तरी देखील त्यांची लग्नं होत नाहीत. लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींची संख्या घटत असल्यामुळे हे समस्या निर्माण होत आहे. केरळमध्ये एक हजार मुलांमागे १०५० मुली असे प्रमाण आहे, भारतातील हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९४० मुली असे आहे.  आज शंभर मुलांत  दहा ते बारा  मुलं लग्नाची राहिलेली आहेत. पाच  वर्षानं वाढेल आणि पंधरा ते वीसपर्यंत जाईल. (March of unmarried youths for not getting married)  सरकारच्या धोरणामुळे ही परिस्थिती आली आहे असा आरोप देखील या तरुणांनी केला आहे.  गर्भलिंग निदान चाचणी राज्य सरकारने बंद केली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा उदात्त हेतू या मोर्चाचा होता. महाराष्ट्रात गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे गंभीर समस्या उत्पन्न होत आहे याकडे या मोर्चाने लक्ष वेधून घेतले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !