शोध न्यूज : लाचखोरीच्या घटना वाढत असतानाच शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी शिपायाने तब्बल पाच लाखांची लाच मागितल्याची घटना उघडकीस आली असून एका शिपायाला अटक करण्यात आली तर दुसरा पळून गेला आहे.
लाचखोरीच्या घटनात सतत वाढ होत असून साहेबापासून शिपायापर्यंत अनेकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत . सोलापूर जिल्ह्यात देखील सतत अशा घटना उघडकीस येत असून मोठे मासे देखील एसीबीच्या जाळ्यात सापडत आहेत. लाच घेताना आपण सापडू नये यासाठी लाचखोर अनेक युक्त्या करीत असून कुणी खाजगी व्यक्तीचा आधार घेते तर कुणी शिपाई मंडळीला पुढे करीत असते. सोलापूरच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय आधीच चर्चेत असताना एका शिक्षिकेचा प्रलंबित असणारा पगार काढण्यासाठी एका शिपायाने पाच लाखांची लाच मागितली असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेला दुसरा एक शिपाई मात्र पळून गेला आहे. बसवनगर, मंद्रूप येथील शिपाई अशोक जाधव याला अटक करण्यात आली असून टेंभुर्णीच्या जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळेचा शिपाई किसन भोसले पाटील हा मात्र निसटला आहे.
तक्रारदार यांच्या पत्नी समाज कल्याण विभागाच्या एका आश्रमशाळेत शिक्षिका आहेत. त्यांचा पगार प्रलंबित असून तो काढण्यासाठी शिपायाने पाच लाखांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आणी त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे दिसून आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिपाई अशोक जाधव याला अटक केली आहे. त्याच्या अटकेची माहिती मिळताच किसन भोसले हा शिपाई पळून गेला आहे. वेतन काढणे हे शिपायाचे काम नाही त्यामुळे पाच लाखाची करण्यात आलेली मागणी ही एखाद्या अधिकाऱ्याकडून शिपायामार्फत करण्यात आली असण्याची शक्यता आहे. (The peon demanded a bribe of five lakhs) त्यामुळे या प्रकरणात शिपायाबरोबरच एखादा 'साहेब' देखील अडकण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !