शोध न्यूज : भ्रष्टाचाराचे मोठे प्रदूषण आजसमोर आले असून सोलापुरात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले आहे.
शासकीय विभागामध्ये भ्रष्टाचाराचे झालेले प्रदूषण वाढत चाललेले असताना आज मोठा मासा सोलापुरात गळाला लागला असून शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे. साखर कारखान्यावर कारवाई न करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल दोन लाखांची लाच मागितली आणि ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अधिकाऱ्यास रंगेहात पकडले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या कारखान्यांना पाठीशी घालणाऱ्या या अधिकाऱ्यास रंगेहात पकडल्यामुळे शासकीय विभागात एकच चर्चा आणि खळबळ दिसून येत आहे. लाचखोरीत प्रदूषण नियंत्रण मंडळ सहसा चर्चेत येत नाही परंतु आज ही मोठी कारवाई झाली असून सापळा यशस्वी ठरला आहे. साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नुतनीकरण करण्यास मदत केल्याबाबत मोबदला तसेच कारखान्यांकडून हवा व पाणी प्रदुषण होत असल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करण्यात आलेल्या होत्या.
साखर कारखान्याच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी असलेल्या अजित पाटील याने कारखान्याकडे दोन लाखांची लाच मागितली. साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नुतनीकरण करण्यास मदत केल्याबद्धल आणि साखर कारखान्याकडून हवा व पाणी प्रदुषण होत असलेबाबत लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरीता व प्रस्तावित फार्मासिटीकल्स युनिटचे कंसेन्स्ट्स टू इस्टॅब्लिश या लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी सदरची दोन लाखांची लाच मागण्यात आली होती. साखर कारखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दोन लाखांची लाच मागितल्यानंतर याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करून या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि या सापळ्यात उप प्रादेशिक अधिकारी पाटील हा अलगद अडकला. दोन लाखांची लाच स्वीकारताना पाटील याला रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक गणेश कुंभार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक , चंद्रकांत कोळी, शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे यांनी ही कारवाई केली. सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारुन उप प्रादेशिक अधिकारी पाटील यांनी वैयक्तीक सांपत्तीक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले आहे. लाचेची मागणी करुन स्वतः लाचेची रक्कम स्विकारली असता रंगेहाथ त्यांना पकडण्यात आले आहे. या कारवाईने प्रदूषण नियंत्रण मंडळासह शासकीय विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर या कारवाईची चर्चा राज्यात देखील सुरु झाली आहे.
पाटील हे आधीपासून वादग्रस्त अधिकारी म्हणून परिचित झाले होते. त्यांचं विरोधात या आधीही काही तक्रारी झाल्या आहेत. पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय कार्यालयास अहवाल सादर केलेला होता. (Solapur Pollution Control Board officer caught red-handed while accepting bribe)यात नियमभंग करणाऱ्या कारखान्यावर कारवाई न करणे, कार्यालयात सतत अनुपस्थित राहणे अशा अनेक तक्रारींचा समावेश होता परंतु त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. आज मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले त्यामुळे त्यांना मोठा दणका बसला आहे. पाटील यांच्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली असून आता लवकरच त्यांचे निलंबन देखील होऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !