शोध न्यूज : ऊस दर आंदोलनाला आता हिंसक वळण लागू लागले असून कोल्हापूर येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला आहे.
साखर कारखाने ऊसाला अपेक्षित दर देत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत तर शेतकरी आक्रमक झाले आहेत. काही कारखाने समजुतीच्या मार्गावर आले असले तरी काही कारखान्यांनी अद्याप शेतकरी संघटनांच्या मागण्याकडे आणि आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. गळीत हंगाम सुरु झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी ऊस दरासाठी आक्रमक आंदोलने सुरु आहेत. कारखान्यांनी मागणीप्रमाणे दर जाहीर करेपर्यंत वाहतूकदारांनी ऊसाची वाहतूक करू नये असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले होते परंतु ही वाहतूक सुरूच रहिली त्यामुळे आंदोलकांनी सुरुवातीला वाहनांचे टायर फोडले आणि आपला विरोध कृतीत उतरवला. त्यानंतरही ऊसाची वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक आक्रमक होऊ लागल्या असून आता वाहने पेटवून देण्यापर्यंत हिंसक मार्गावर आंदोलन पोहोचू लागले आहे.
मागच्या हंगामातील हिशोब देवून शेतकऱ्यांना त्वरित रक्कम दिली जावी अशी मागणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांपेक्षा तोडणी, वाहतूक खर्चही १२५ ते १५० रुपयांनी जादा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. मागच्या गळीत हंगामात जवळपास १४ कोटीची लुट केली असल्याचा आरोप करीत जय शिवराय किसान संघटनेने दत्त दालमिया कारखान्याच्या गेट समोर जय शिवराय किसान संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. त्यातून कारखान्याची ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा संघटनेने दिलेला होता. या आंदोलनाचा भडका आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील उस दर आंदोलन आता हिंसक वळणावर जाऊन पोहोचले असून हा भडका वाढू लागल्याचे दिसत आहे. पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला आहे. हा ट्रॅक्टर ऊस घेवून दालमिया साखर कारखान्याकडे निघाला असताना शिये भुये मार्गावर रात्रीच्या अंधारात तो पेटवून देण्यात आला आहे. (A tractor transporting sugarcane was set on fire) या घटनेने अन्य वाहनधारक देखील धास्तावले असून हिंसक वळण लागू लागल्याने खळबळ उडाली आहे. आंदोलनाचा हा भडका आता आणखी अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !