सोलापूर : राज्य परिवहन कर्मचारी संपावर असले तरी माघ वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोलापूर विभागातील पाच आगारातून लालपरी सेवेस हजर राहणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली आहे.
राज्य परिवहन कर्मचारी संपावर गेल्याचे एस टी ची चाके फिरायची थांबली असून सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच पंढरीची माघ वारी सुरु झाली असून १२ फेब्रुवारीस एकादशी आहे. पंढरीच्या वारीसाठी राज्यातून आणि बाहेरूनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यात मागच्या वर्षापासून पंढरीच्या यात्रा कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातील भाविक आसुसलेले आहेत. कोरोनामुळे पंढरीची वारी आणि विठुरायाचे दर्शन या सगळ्यावरच मर्यादा आली. माघ यात्रेसाठी कोरोनाचे नियम पाळून परवानगी देण्यात आली असल्याने भाविक पंढरीकडे येत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून पंढरी गजबजू लागली असून प्रदीर्घ काळानंतर पंढरी फुलू लागल्याचे पाहायला मिळू लागले आहे.
पंढरीच्या माघ यात्रेस परवानगी मिळाली असली तरी राज्य परिवहन कर्मचारी संपावर असल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत परंतु माघ वारीनिमित्त पंढरीस येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता यावर्षी एस टी अपुरी पडणार आहे. भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले असून सोलापूर विभागातील पाच आगारातून एस टी सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर, कुर्डूवाडी, बार्शी, मंगळवेढा, सांगोला या पाच आगारातून वारकऱ्यांच्या सोयीसाठी लालपरी धावणार आहे. तशा पद्धतीने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन देखील केले आहे.
कोरोनाच्या आक्रमणामुळे एप्रिल २०२० पासून अनेक बंधने आली आणि यात पंढरीच्या यात्रा होऊ शकल्या नाहीत. केवळ उपचार म्हणून वारी साजरी झाली आणि राज्यातील भाविकांना पंढरीला येता आले नाही. भाविक आणि पंढरी यांच्यात कोरोनाची मोठी भिंत गेल्या पावणे दोन वर्षांपासून उभी राहिल्याने भाविकांना पंढरीला येत आले नाही. आषाढी वारीसारखी प्रमुख वारी देखील होऊ शकली नव्हती. मानाच्या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून आणाव्या लागल्या होत्या. आता मात्र कोरोनाची तिसरी लाट देखील ओसरत चालली असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून माघ यात्रा साजरी होत आहे याचा भाविकातून विशेष आनंद दिसत आहे.
कोरोनाची लाट ओसरू लागलेली असतानाच दुसरीकडे लसीकरण वेगाने होत आहे. माघ यात्रेसाठी शासनाने परवानगी दिलेली असली तरी माघ वारीसाठी येणाऱ्या भाविकांचे लसीकरण झाले असणे आवश्यक आहे. पंढरीस येणाऱ्या भाविकांकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शिवाय कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रत्येक भाविकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक असून अन्य सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त आहे.
राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संपावर असल्याने आणि लालपरी जागेवरच थांबून असल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे तसेच एस. टी. धावत नसल्याने माघी यात्रेवर परिणाम दिसणार आहे अशी भीती आहेच परंतु वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाने लालपरी धावण्याचे नियोजन केले असल्याने काही प्रमाणात का होईना भाविकांना दिलासा मिळणार आहे आणि पंढरीला येण्याजाण्याची त्यांची सोय होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !