BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ नोव्हें, २०२३

सोलापुरी आमदार म्हणतात, ' मी राजीनामा देण्यास तयार' !




शोध न्यूज : मराठा आरक्षणाची मागणी घेवून आणि मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी राजीनामे दिले असतानाच, सोलापुरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख  यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र पेटला असून, मराठ्याचा स्वाभिमान असलेल्या अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे भिरकावून दिले आहेत. यात आमदार, खासदार, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विविध पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील एका खासदाराने राजीमाना दिला पण हा केवळ  दिखावा केला असल्याचा आरोप होत आहे. मराठा समाजाचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी देखील आपले राजीनामे दिले आहेत तर , अनेक जण केवळ राजीनामे देण्याच्या घोषणा करीत आहेत.  ज्यांनी दिखाऊपणा केला आहे त्यांना मराठा योग्य वेळी उत्तर देणार आहेच पण यामुळे ढोंगी मंडळी देखील उघडी पडली आहेत.  किमान मराठा समाजातील ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा असताना, अनेक मराठा सदस्य, सरपंच खुर्चीला चिकटून बसले आहेत. अर्थात याची नोंद मराठा समाज घेत असून, त्यांची जागा त्यांना दाखविण्याची तयारी समाजाने ठेवली असल्याचे दिसत आहे. खुर्ची प्रिय की मराठा समाजाची मागणी महत्वाची ? याचे उत्तर त्यांच्या वागण्यावरूनच मिळताना दिसत आहे.


मराठा समाजाच्या मागणीसाठी मुग गिळून गप्प असलेल्या अनेक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी आता राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. जे असे करीत नाहीत त्यांना मराठा विरोधक समजले जाऊ लागले आहे. सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर देखील मराठ्यांनी ठिय्या मारला त्यानंतर देशमुख यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. एकदिवसीय अधिवेशन बोलावून हा प्रश्न निकाली काढावा अशी विनंती मराठा समाजाचा एक घटक म्हणून करत आहे, असे आमदार देशमुख यांनी या पत्रात नमूद केले आहे. (Maratha Movement and Resignations) राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवली असली तरी प्रत्यक्षात राजीनामा मात्र देण्याचे धाडस त्यांनी दाखवलेले  नाही, याचीही नोंद मराठा समाजाने घेतली आहे.


ग्रामपंचायतीच्या अनेक सदस्य आणि सरपंचानी राजीनामे फेकून मराठ्याचा स्वाभिमान जपला आहे. बहुतेक ग्रामपंचायतीत मराठा सरपंच, सदस्य आहेत, पण अनेकांनी मराठ्याच्या स्वाभिमानापेक्षा खुर्चीला महत्व दिले आहे आणि त्याच खुर्चीला कवटाळून राहणे पसंत केले आहे. मराठा समाज या कृतीकडे गंभीरपणे पाहत असून, जे गरजेच्या वेळी मराठा समाजासोबत राहू इच्छित नाहीत, त्यांना पुन्हा मराठा मानायचे का ? अशा संधीसाधुना पुन्हा निवडून द्यायचे का ? याबाबत मराठा समाज गंभीर झालेला दिसत आहे. मराठा समाजातील तरुण मृत्यूला कवटाळत असताना, हे मात्र खुर्चीला चिकटून बसले आहेत त्यामुळे हे मराठ्यांचे नाहीत तर केवळ खुर्चीचे गुलाम आहेत अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील आमदार सुभाष देशमुख यांनी किमान राजीनामा देण्याची तयारी तरी दाखवली पण सोलापूर जिल्ह्यातील बाकी आमदार्नाचे काय ? मराठा समाजाचे आमदार असूनही केवळ दिशाभूल ? आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत अशा पोकळ वल्गना खूप झाल्या, कृती काय ? तुम्ही खरेच मराठा समाजाच्या सोबत आहात काय ? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. मराठ्यांना मूर्ख समाजात खुर्चीला चिकटून राहिलेल्या या आमदारांना पुढच्या निवडणुकीत, मराठा कोण आहे ? काय आहे ? आणि तो काय करू शकतो ? याचे उत्तर देईल असे मराठा समाज बोलू लागला आहे. आमदार होण्यासाठी मराठा, मग मराठ्यासाठी आमदार का नाही ? एवढा एकच सवाल विचारला जाऊ लागला आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !