BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ नोव्हें, २०२२

ढाब्यावर मद्यप्राशन, हॉटेल मालकांसह मद्यपींना दंड !

 


शोध न्यूज : ढाब्यांवर अवैधरित्या मद्यविक्री आणि मद्यप्राशन करणाऱ्या १७ जणांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने या सर्वाना हजारो रुपयांचा दंड ठोठावला आहे.   


राज्यात सगळीकडेच ढाबे आणि हॉटेलमधून विनापरवाना मद्यविक्री केली जाते तसेच परवाना नसताना तेथे बसून मद्य प्राशन केले जाते. गेल्या काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापे टाकले जात असून सोलापूर जिल्ह्यातही अशा कारवाया झाल्या आहेत. सोलापूर, बार्शी येथे अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल मालक आणि तेथे बसून मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामावर गुन्हे दाखल करण्यात आले. तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आणि न्यायालयाने त्यांना मोठा दंड देखील केला आहे. काही दिवसांपूर्वीच ही कारवाई झालेली असताना आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील १५ तळीराम आणि दोन हॉटेल मालक यांच्यावर अशी कारवाई करण्यात आली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सोलापूर येथील दोन हॉटेलवर अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला आणि दोन्ही ठिकाणी मद्यविक्री तसेच मद्यप्राशन सुरु असल्याचे या छाप्यात निदर्शनास आले. या दोन्ही ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. यातील एक कारवाई मंगळवेढा येथील 'मराठावाडा' ढाब्यावर छापा टाकला गेला होता. येथे अवैधरित्या मद्याची विक्री देखील करण्यात येत होती. ढाबाचालक श्रीकांत लेंडवे याच्यासह संजय जाधव, सचिन उन्हाळे, शंकर आसबे, उत्तम भुसे, कानिफनाथ लोखंडे, योगेश फराटे, गणेश मोरे, लखन मंडलिक हे मद्यप्राशन करीत बसलेले होते. 


माळशिरस विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या सर्वावर गुन्हा दाखल करून अटक केली होती शिवाय आरोपीकडून १ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींच्या विरोधात एका दिवसातच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आणि  तातडीने सुनावणीही झाली. दारूबंदी न्यायालयाने तत्काळ निकाल देत हॉटेल चालकाला २५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे तर मद्यप्राशन करीत बसलेल्या ८ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Illegal liquor consumption at dhaba, customer hotel owner fined)  महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलम ६८ अ, ब, आणि कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.     


सोलापूर येथे विजापूर रोड परिसरातील 'जलसा' ढाब्यावर देखील असाच छापा टाकला गेला आणि येथे अवैधरीत्या मद्यविक्री आणि मद्यप्राशन सुरु असल्याचे दिसून आले. या ठिकाणी हॉटेल चालक मंगेश होटकर याच्यासह किशोर भूमकर, रोहित पतंगे, विनायक चव्हाण, विनायक होटकर, दर्शन चव्हाण, स्वप्नील गायकवाड, कांतेप्पा चव्हाण या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आणि लगेच सुनावणीही झाली. हॉटेल चालकास न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून मद्यप्राशन करीत बसलेल्या ७ जणांना प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.      


ढाब्याढाब्यावर अवैधरीत्या दारूची खुलेपणाने विक्री होते आणि अशा ठिकाणी बसून मोठ्या संख्येने मद्यप्राशन केले जाते. सगळीकडेच अत्यंत उघडपणे हा प्रकार बिनधास्त सुरु असून त्यांच्यावर कारवाई देखील होत नसते. अशा ठिकाणी मद्यविक्री अथवा मद्यप्राशन हे कायद्याने गैर असले तरी याची जाणीवही कुणाला होत नाही एवढ्या खुलेपणे हा सर्व प्रकार सुरु असतो. शासनानाचा महसूल बुडवत अत्यंत उघडपणे दिवसरात्र हा खेळ सुरु असतो. कारवाई होत नसल्यामुळे कायद्याची जाणीवही कुणाला होत नसून परवानगी असल्याप्रमाणे ढाबाचालक मद्यविक्री करतात आणि ग्राहक देखील 'निवांत' बसून मजा घेत असतात. गेल्या काही दिवसांपासून मात्र राज्यात याकडे लक्ष दिले जाऊ लागले असून धडाधड कारवाई केली जात आहेत त्यामुळे ढाबे चालकाचे धाबे दणाणले आहेत. अजूनही अनेक ठिकाणी असे प्रकार असून त्यांचा नंबर कधी लागतोय याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !