शोध न्यूज : सोलापूर - पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात दोन शेतकरी आणि एक चालक असा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पंढरपूर - मोहोळ मार्गावर अपघात होऊन पंढरपूर येथील तीन तरुणाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना नुकतीच घडली होती. या अपघाताचे दु:ख व्यक्त होत असतानाच मोहोळजवळ आणखी एका अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कांदा घेवून चाललेल्या पिकअप चा अपघात सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाला आणि यात तिघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने निघालेल्या पिकअपचा (एमएच १६ ए वाय- २६७४) मागच्या बाजूचा टायर अचानक फुटला आणि त्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप पलटी झाला. मोहोळपासून दहा किमी अंतरावर कोळेगाव फाट्यावर हा अपघात झाला असून मृतात दोन शेतकऱ्यांसह चालकाचाही समावेश आहे. नगर जिल्ह्यातील कोरेगाव येथून हा पिकअप कांदा घेवून सोलापूर कृषी बाजार समितीत विक्रीसाठी घेवून निघाले असताना मोहोळजवळ हे वाहन उलटले गेले.
पिकअप वाहनाचा टायर फुटताच हे वाहन रस्त्याचे कडेला उलटले. धावते वाहन उलटल्यामुळे वाहनातील दोन शेतकरी बाहेर फेकले गेले. कोरेगाव, ता. कर्जत जिल्हा अहमदनगर येथील बिरमलसिंग धोंडी सिंग परदेशी (वय-५०), दत्तात्रय भानुदास शेळके (वय-५५) हे दोन शेतकरी जोराने बाहेर फेकले गेल्याने त्यांना जोराचा मार लागला तर चालक नितीन धुळाजी बदंगे (बदंगेवाडी, ता. कर्जत ) हा देखील जबर जखमी झाला होता. जखमींना उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु दोन्ही शेतकरी उपचारापूर्वीच मृत्युमुखी पडले होते. चालक नितीन बदंगे यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले होते परंतु उपचार सुरु असताना त्याचाही मृत्यू झाला. (Three killed in accident on Solapur-Pune highway) त्यामुळे या अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघाताच्या वाढत्या घटनामुळे चिंताही वाढत चालली असल्याचे दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !