BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ नोव्हें, २०२२

गुप्तधनाच्या बहाण्याने लाखोंचा गंडा, भोंदू पितापुत्राला अटक !

 



शोध न्यूज : गुप्तधनाचा बहाणा करून लाखो रुपयांना लुटणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एक भोंदूला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली असून त्याने पाच जणांची फसवणूक करून गंडा घातला होता. 


विज्ञानयुगाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी देखील फसवणारे आणि फासणारे लोक आजही जागोजागी भेटतात. जीवन जगताना विविध समस्या सर्वांनाच असतात पण काही जण याला वेगळा अर्थ देतात आणि मग गंडा दोरा, भूत, भानामती अशा दुष्टचक्रात अडकतात. अशा लोकांवर नजर असलेले काही भामटे भोंदू बरोबर हे सावज हेरतात आणि त्यांची फसवणूक करतात. यामुळे आधीच अडचणीत असलेले लोक आणखी गोत्यात येतात. आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असल्या तरीही भोंदूच्या भूलथापांना हे लोक बळी पडतात आणि सहजच त्याची 'शिकार' होताना दिसतात. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच जणांना बार्शीच्या एका भोंदूने भूलथापा देत लाखो रुपयांची टोपी घातली परंतु अखेर पोलिसांनी त्याला गजाआड केले. 


मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील मायाक्का रेवणसिद्ध मोटे यांनी अशा फसवणुकीबाबत मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवून सदर भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत. "सोने, दागिने, गुप्तधन तुमच्या नशिबात आहे परंतु आपल्या नशिबात नाही, त्यामुळे तर मी पत्र्याच्या घरात राहतो" अशी बतावणी करून एका भामट्याने पाच जणांना तब्बल १३ लाख ४४ हजाराचा गंडा घातला असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात बार्शीच्या या महाराजाला आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात यश मिळवले आहे.  बाशी तालुक्यातील मालवंडी येथील भोंदू महाराज भगवान उर्फ सुदर्शन जगन्नाथ स्वामी आणि त्याचा मुलगा वीरभद्र उर्फ उदय भगवान स्वामी यांनी ओळख मायाक्काचे पती यांच्यासोबत झाली होती. सुशीलकुमार गवळी याने ही ओळख करून दिली होती. 

 
या ओळखीवर कथित महाराज पिता पुत्र मायाक्का यांच्या घरी आले आणि "घराची शांती करून देतो, तुमच्या जमिनीत गुप्तधन आहे ते देखील तुम्हाला काढून देतो. तुमच्या घरात भांडणतंटे होणार नाही याची बांधी करून देतो" अशा बतावण्या केल्या. हे सर्व करण्यासाठी चार लाखांचा खर्च येईल असे देखील सांगितले. या दोघांनी मायाक्का यांना पाण्यातून पांढऱ्या रंगाचे भस्म प्यायला दिले आणि दोन लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. उरलेले दोन लाख रुपये देखील द्यावेत म्हणून ते फोन करीत राहिले. पंढरपूर येथील संजयकुमार शिंदे याच्यासोबत जाऊन उरलेले दोन लाख देखील त्याच्या गवळी करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे चार लाख रुपये दिल्यानंतर आता आपल्या घरातील जमिनीच्या खाली असलेले गुप्तधन मिळेल अशी आशा वाटली होती पण तसे घडले नाही. 


चार लाख रुपये घेतल्यानंतर गुप्तधन काढण्यासाठी पुन्हा पैशाची मागणी करू लागले. "तुमच्या घरात बाधा आहे, ती काढल्याशिवाय गुप्तधन काढता येणार नाही" असे सांगत या भोंदूने आपल्या जवळच्या कागदाच्या पुडीतील पांढऱ्या रंगाची पावडर पाण्यातून पिण्यासाठी दिली. या महाराजाने मायाक्का यांच्या पतीच्या पायावर आणि पाठीवर काठीने जबर मारहाण केली आणि होमहवन सुरु केले. पांढऱ्या रंगाची पावडर प्यायला दिल्यामुळे त्यांना काहीच समजले नाही. नंतर येतो असे सांगून ते निघून गेले. दरम्यानच्या काळात सात लाखांची रक्कम महाराजाने लाटली होती पण गुप्तधन मात्र काढून दिलेच नव्हते. (Superstition: Cheating on the pretext of secret money)  पावडर प्यायला देवून पूजा करण्याच्या नावाने झालेल्या मारहाणीत मात्र मायाक्काच्या पतीच्या पायाचे हाड मात्र मोडले होते. 


या भोंदू महाराजाने केवळ असा एकच प्रकार केला नव्हता तर एकेक माहिती मिळत गेली. नंदेश्वर येथील मल्हारी करे यांचे लग्न जमत नाही त्यामुळे त्याची बाधा दूर करतो म्हणून ६० हजार, अंगणातून गुप्तधन काढून देतो असे सांगून सुशीलकुमार गवळी यांच्याकडून ४ लाख ५४ हजार ९०० रुपये, करणीची बाधा काढून देतो म्हणून भोसे येतील चेतन वाघमोडे यांच्याकडून १ लाख रुपये, घरात होणारी बाधा आणि भांडण बंद करतो असे सांगत भोसे येथील तानाजी बीरा सरगर यांच्याकडून ३० हजार रुपये तसेच मायाक्का मोते यांच्याकडून ७ लाख असे १३ लाख ४४ हजार ९०० रुपये एवढी रक्कम या महाराजाने लाटली असल्याचे सदर फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचं मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरु केला आणि बार्शी तालुक्यातील महाराज पिता पुत्रांना अटक केली. या घटनेची मंगळवेढा तालुक्यात मोठी चर्चा असून अशाच प्रकारे आणखी कितीजणांची फसवणूक केली आहे हे देखील उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !