शोध न्यूज : त्याने आपल्या प्रेयसीचा खून केला आणि नंतर रोज तिच्या शरीराचा एकेक तुकडा वेगवेगळ्या भागात फेकून दिला परंतु अखेर या घटनेचा उलगडा झाला पण क्रूरतेने मात्र मानवता हादरून गेली.
आधी प्रेम आणि नंतर क्रूरपणा अशी शेकडो उदाहरणे घडत असतात, यातील काही घटना अत्यंत क्रूर असतात. या क्रूरतेलही लाजवणारी एक घटना उघडकीस आली असून आपल्याच प्रेयसीचा खून करून तिचे तबल ३५ तुकडे करून ते वेगवेगळ्या भागात फेकून दिले आणि पुरावे राहणार नाहीत तसेच हा प्रकार कुणाच्या लक्षात येणार नाही याची पुरेपूर काळजी एका नराधम तरुणाने घेतली. हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तेंव्हा ज्याच्या त्याच्या काळजात धस्स झाले आणि माणूस किती राक्षसी क्रूरतेने वागू शकतो याचे हे एक उदाहरण समोर आले. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा आवळून तिचा आधी खून केला आणि मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने वेगळीच युक्ती शोधली.
आफताब अमीन पूनावाला असे या अमानवी वृत्तीच्या तरुणाचे नाव असून त्याने श्रद्धा वॉकर या आपल्याच प्रेयसीचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने केला. श्रद्धा वॉकरच्या वडिलाने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली होती आणि पोलीस तिचा शोध घेत होते. २६ वर्षे वयाची श्रद्धा ही मुंबईतील एका मोठ्या कंपनीत काम करीत होती. तेथे तिची या आफताबशी भेट झाली होती. त्यानंतर या दोघांचे आधी मैत्रीचे संबंध निर्माण झाले आणि त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागली. याची कुणकुण तिच्या घरी लागली तेंव्हा तिच्या घरच्यांनी विरोध केला. हा विरोध डावलून दोघे एकत्रच राहू लागले. विरोध वाढू लागल्याने अफताब याने मुंबई सोडली आणि मेहरोलीच्या छतरपूर परिसरात दोघे राहू लागले.
मुंबई सोडल्यानंतरही हे दोघे दिल्लीतील एका कंपनीत काम करू लागले पण तेथे दोघांचे भांडण सुरु झाले. इकडे पोलीस आणि श्रद्धाचे नातेवाईक शोध घेत होते. अखेर तिचा शोध घेत वडील तिच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचले पण श्रद्धाच्या घराचे दार बंद आढळले. त्यानंतर वडिलांनी मेहरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी तातडीने या प्रकरणी शोध सुरु केला. पोलिसांनी कौशल्याने आफताबला अटक केली पण श्रद्धा मात्र दिसत नव्हती. पाच महिन्यांनी पोलीस आफताबपर्यंत पोहोचले होते. त्याने सुरुवातीला उडवा उडवी सुरु केली पण पोलिसांनी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने दिलेली माहिती ऐकून पोलीसही अवाक होऊन पाहत राहिले.
श्रद्धा वॉकर सतत लग्नासाठी दबाव टाकत होती त्यामुळे आपसात भांडणे होत होती. अखेर आफताबने तिचा गळा दाबला आणि जीव घेतला. श्राद्धाला मारून टाकल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन अत्यंत थंड आणि शांत डोक्याने केले. त्याने एक मोठा फ्रीज खरेदी केला. श्रद्धा वॉकरच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. रोज मध्यरात्री तो बाहेर पडायचा आणि जाताना पिशवीतून मृतदेहाचा केवळ एकच तुकडा सोबत घ्यायचा. दूर आणि वेगवेगळ्या भागात जाऊन तो तुकडा तो फेकून द्यायचा. तिच्या शरीराचा तुकडा तो एवढा बारीक करायचा की कुणाला दिसला तरी तो मानवी अवयवाचा तुकडा आहे याची शंकाही येवू नये. अठरा दिवस त्याचा हा नित्यक्रम सुरु होता. तुकडे तुकडे करीत त्याने अठरा दिवसात हा मृतदेह तुकड्यांच्या स्वरुपात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिला आणि याचा कुणाला थांबपत्ता लागला नाही. अखेर त्यानेच कबुली दिली तेंव्हा ही घटना उघडकीस आली.
प्रेयसीचा अशा प्रकारे खून करणारा नराधम सापडला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली परंतु पोलिसांना मृतदेहाचे अवशेष मिळाले नाहीत. पोलिसांनी आफताब याला अटक केली आहे आणि आता पोलीस श्रद्धा वॉकर हिच्या मृतदेहाचे पुरावे शोधू लागले आहेत. (The girlfriend was murdered and cut into thirty five pieces) एवढी क्रूर घटना पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत. माणूस किती राक्षसी प्रवृत्तीचा बनू शकतो हेच या घटनेने दाखवून दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !