शोध न्यूज : पदाचा दुरुपयोग करून आपल्याच मुलाला ग्रामपंचायतीचे शिपाई बनविल्याने सोलापूर जिल्ह्यातील एका सरपंचाचे पद अपिलात देखील रद्द ठरविण्यात आले आहे त्यामुळे शिपाईपदावर मुलाचीच नियुक्ती करणे महागात पडले आहे.
सरपंचपदाचा उपयोग गावाचा कारभार हाकण्यासाठी करणे अपेक्षित असते परंतु अनेक गावातील सरपंच आपल्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त निर्णय करतात. गावच्या हितापेक्षा आपले हित साधण्यासाठी पदाचा वापर करतात आणि मग कायद्याच्या कचाट्यात सापडून 'तेल गेले आणि तूपही गेले' असा अनुभव येतो. आपण सरपंच झाले की आपल्याच घरातील मुलाला ग्रामपंचायतीच्या नोकरीत चिकटविण्याचे काही प्रकार या आधीही घडले असून अशा कृतीमुळे त्यांना सरपंचपद गमवावे लागले आहे. असेच एक प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक सरपंचांच्या अंगलट आले असून मुलाला ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नियुक्ती दिल्याने त्यांचे पद रद्द ठरविण्यात आले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील पालापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांची मुदत याच महिन्यात संपत आहे आणि याच महिन्यात सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. पालापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. जनतेतून थेट सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती आणि या निवडणुकीत शेकाप्पा कलगुटगे हे निवडून आले होते. सरपंचपदी थेट जनतेतून निवडून आल्यानंतर कलगुटगे यांनी आपला मुलगा भद्रीनाथ याची ग्रामपंचायत शिपाई म्हणून वर्णी लावली होती. सरपण कलगुटगे यांनी शिपाई पदावर आपल्या मुलाची नियुक्ती केल्याचे मान्य नसल्याने गावातील बबन जमादार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीची सुनावणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासमोर झाली आणि या सुनावणीत कागदपत्रांची तपासणी झाली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ फ चा भंग झाल्याची बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी कलगुटगे यांचे सरपंचपद रद्द ठरवले. २५ मे २०२२ रोजी सरपंचपद रद्द ठरविल्याचा आदेश आला आणि कलगुटगे यांनी या आदेशाच्या विरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले. विभागीय आयुक्त यांच्यापुढे सुनावणी होऊन त्यांनीही जिल्हाधिकारी सोलापूर यांचा आदेश कायम ठेवला त्यामुळे सरपंचपद रद्द ठरण्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. सरपंचपदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल आला आहे.
पालापूर ग्रामपंचायत सरपंच पदाची मुदत याच महिन्यात संपत असताना हा निकाल आला आहे. नव्या सरपंचांची निवडणूक तोंडावर आहे आणि अशा वेळीच अपिलातील हा निकाल आला आहे. जनतेतून थेट सरपंचपदी निवडून येवूनही ग्रामपंचायतीत आपल्याच मुलाची शिपाई म्हणून नियुक्ती केल्याने कलगुटगे यांचे सरपंचपद रद्द ठरले आहे. (Son's job in Gram Panchayat, Sarpanch post cancelled) पाच वर्षे सरपंचपद उपभोगल्यानंतर आता मुदत संपत असताना त्यांचे हे पदच रद्द ठरले गेल्याने तालुकाभर चर्चेचा विषय बनला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !