BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२२

पत्नीचा खून, सात महिन्यात पतीला जन्मठेप !

 




शोध न्यूज : पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पतीला सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


न्यायालयात 'तारीख पे तारीख' मिळते पण लवकर न्याय मिळत नाही असे म्हटले जाते परंतु सोलापूर जिल्ह्यातील एका घटनेत अवघ्या काही महिन्यात एका खून प्रकरणाची सुनावणीही झाली आणि आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षाही सुनावली आहे. महिला अत्याचाराचा घटना वाढत असताना अशा प्रकारे लागलेला जलद निकाल आणि झालेली शिक्षा यामुळे महिलावर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होणार आहे.  उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील ३२ वर्षीय आप्पा भोजप्पा चव्हाण याने आपल्या पत्नीचा खून करून, नंतर पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि जलद गतीने केलेल्या तपासामुळे आरोपीवरील गंभीर गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकला. 


आरोपी आप्पा चव्हाण याने १६ मार्च २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास पत्नी रेणुका हिचा राहत्या घरात खून केला होता. घरगुती कारणावरून झालेल्या भांडणातून त्याने रेणुका हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले. यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागून ती रक्तबंबाळ झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडून तिचा जागीच मृत्यू देखील झाला होता. पत्नी रेणुका हिचा मृत्यू झाल्यानंतर पती आप्पा चव्हाण याने अत्यंत शांत डोक्याने पडलेल्या रक्तावर पाणी ओतले, तोंड, हातपाय पाण्याने धुवून खून केल्याचा पुरावा नष्ट केला होता. रेणुकाचे वडील लक्ष्मण काळे यांनी मात्र याबाबत सोलापूर तालुका पोलिसात या घटनेबाबत फिर्याद दिली होती आणि त्यानुसार पोलिसांनी पती आप्पा चव्हाण याच्या विरोधात खून केल्याचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 


पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून जलद गतीने आप्पा चव्हाण याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी होऊन अप्पा चव्हाण याला खून केल्याच्या आणि पुरावा नष्ट केल्याच्या कलमानुसार न्यायालयाने दोषी धरले. खून केल्याप्रकरणी चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी देखील त्याला दोषी धरण्यात आले असून त्यासाठी ३ वर्षांची शिक्षा आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


सदर खटल्यात दहा साक्षीदार तपासण्यात आले आणि सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी चव्हाण यास ही शिक्षा सुनावली आहे. (Murder of wife, life imprisonment for husband in seven months) सरकारपक्षाच्या वतीने अतिरिक्त  सरकारी वकील ॲड. ए. जी. कुलकर्णी यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड. आर. बी. बायस यांनी काम पाहिले. मार्च २०२२ मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा तपास आणि सुनावणीही जलद गतीने झाली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये या खटल्याचा निकालही आला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !