BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२२

मंत्र्याचे कपडे फाडा, दहा लाखांचे बक्षीस घेवून जावा !

 




शोध न्यूज : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडा आणि दहा लाखांचे बक्षीस घेवून जावा अशी जाहीर ऑफरच राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर यांनी दिली आहे. 


शिंदे गटातील काही मंत्री आणि आमदार बेताल वक्तव्याबद्धल प्रसिद्ध झाले असून त्यांच्यामुळे शिंदे गट टीकेचा धनी होत असून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेवरही याचा परिणाम होताना दिसत आहे. मंत्री, आमदार असताना कायद्याची चौकट मोडली जात असून यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही गोची होत आहे . शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आणि कधी नव्हे एवढी राजकारणाची पातळी रसातळाला गेली आहे. असभ्य राजकारण पाहून सामान्य जनताही हैराण झालेली असतानाच शिंदे गटातील आणखी एका मंत्र्याने 'तारे' तोडले आहेत. महिला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात अत्यंत बेमुर्वत विधान करून अपशब्द वापरण्याचा 'पराक्रम' राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे आणि त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत.


सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा सोपस्कार केला असला तरी त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांची माफी मागितली नाही. माफी नको, राजीनामा हवा, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानाही सत्तार यांची घाणेरडी मुक्ताफळे आवडलेली नसून त्यांनीही या बेताल मंत्र्यांची कानउघडणी केली आहे. राजकीय पक्षच नव्हे तर सामान्य जनता देखील सुप्रिया सुळे यांना केलेल्या शिवीगाळीमुळे व्यथित आणि संतप्त आहे. राष्ट्रवादी तर प्रचंड आक्रमक असून राज्यभर संतापाचा भडका उडालेला आहे. अशाच स्थितीत राष्टवादीच्या नेत्या रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यासाठी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.    


शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील चाळीस आमदारांच्या बाबतीत राज्यात असंतोष असून या मंत्री आणि आमदारांना सरकारी सुरक्षा घेवून फिरावे लागत आहे. त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या पडत आहेत. त्यातच हे मंत्री, आमदार आणखी नाराजी ओढवून घेत आहेत. अशाच परिस्थितीत अब्दुल सत्तार यांचा निषेध तर होतच आहे पण त्यांचे कपडे फाडल्यास दहा लाखांचे बक्षीस देवू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा तौर यांनी जाहीरपणे ही ऑफर दिली असून त्यामुळे सत्तार यांची अवस्था आणखी बिकट होणार आहे. तौर यांनी सत्तार यांचा निषेध तर केलाच आहे पण बक्षीसही जाहीर केले आहे. 


"अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करीत आहेच पण सुप्रियाताईच नव्हे तर या मंत्र्याने महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. अब्दुल सत्तार, मी तुला सांगते, सुप्रिया ताईंजवळ एवढं आहे की त्या तुझ्या सात पिढ्या विकत घेऊ शकतील. 'पन्नास खोके, एकदम ओके'...  शिंदे गटाने पन्नास खोके घेऊन सरकार ओरबाडून आणले आहे.  सत्तार हे महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर असतील तिथे कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडावेत. त्याचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः दहा लाख रुपयांचं बक्षीस देईन, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर दिले आहे.


राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २४ तासाची मुदत देवून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (A reward of Ten lakhs for tearing the minister's clothes)राष्ट्रवादीने राज्यपालांना भेटून देखील याबाबत एक निवेदन दिले आहे. २४ तासांची मुदत संपल्यावर राष्ट्रवादी आणखी कुठले पाऊल उचलणार याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे. एका पाठोपाठ एका मंत्र्यांनी आणि आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवली असून याचसाठी शिवसेना फोडून सत्ता हवी होती काय ? असा सवाल आता सामान्य नागरीकातून देखील व्यक्त होऊ लागला आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !