शोध न्यूज : कुंपणच कसे शेत खाते याचे मोठे उदाहरण समोर आले असून लाचखोरी पकडणाऱ्या अधिकाऱ्यालाच लाच प्रकरणी अटक करण्यात आली असून या महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे.
लोकसेवकांत लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लाच दिल्याशिवाय काम न करणारे काही अधिकारी, कर्मचारी तुरुंगात जाताना पाहायला मिळतात. यात मोठ्या साहेबांपासून शिपायापर्यंत समावेश असतो. शासकीय कार्यालयात होणाऱ्या लाचखोरीवर नियंत्रण यावे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा एक स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची पडताळणी करून त्याला गजाआड करण्याचे काम हा विभाग करीत असते. लोक मोठ्या विश्वासाने लाचाखोराच्या विरोधात तक्रार घेवून या विभागाकडे जात असतात पण याच विभागातील महिला अधिकारी लाच प्रकरणात पकडली गेल्याने कुंपणच नेमके कशा प्रकारे शेत खाते हेच समोर आले आहे आणि या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे.
लाचखोरीला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या अॅन्टी करप्शनच्या महिला अधिकाऱ्यालाच लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. एका तक्रारी अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थांच्या मार्फत लाचेची मागणी करणाऱ्या महिला पोलीस निरीक्षक मीना बकाल हिला एसीबीनेच पकडले आहे. तिच्यासह तिच्या पतीला देखील अटक करण्यात आली असून दोघांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. लातूर जिल्हयातील अहमदपूर येथील खाजा मगदूम शेख यांचे बंधू शेख मेहराज हे कंधारच्या तहसील कार्यालयासमोर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय करतात. या शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यामुळे शेख हे काहीसे घाबरले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे कार्यरत असलेल्या मीना बकाल या महिला पोलीस निरीक्षकाने मध्यस्थांच्या मार्फत १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेख यांच्याविरोधात आलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
कुणी शासकीय अधिकारी अथवा लोकसेवकाने लाचेची मागणी केली तर ज्यांचाकडे तक्रार करायची तेच लाच मागत असल्याचे पाहून शेख आश्चर्यचकित झाले. त्यांनी थेट संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी बकाल यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी ज्या मध्यस्थामार्फत लाचेची मागणी केली होती त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांचाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अॅन्टी करप्शनच्या पथकानं पोलिस निरीक्षक मीरा बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावसकर यानाही अटक करण्यात आली. बकाल या गेल्या वर्षभरापासून नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होत्या आणि २०१२ साली त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !