BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ नोव्हें, २०२२

शेतकऱ्याने काढले कपडे आणि उडाली प्रशासनाची दाणादाण !

 



शोध न्यूज : नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याने अंगावरील सगळेच कपडे काढले आणि सरकारी यंत्रणेची प्रचंड तारांबळ उडाली. एका वेगळ्या प्रकारच्या आंदोलनाने प्रशासनाची जोरदार पळापळ झाली.


सरकारी यंत्रणा बेपर्वाईने वागते तेंव्हा जनता आंदोलन करीत रस्त्यावर उतरते. गेल्या काही वर्षात आंदोलनाचे एकापेक्षा एक लक्षवेधी प्रकार समोर येत असतात. मोर्चा, उपोषणे अशी आंदोलने आता निष्क्रिय आणि  गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासकीय यंत्रणेला ताळ्यावर आणण्यास कमी पडू लागली आहेत त्यामुळे आंदोलनाचे नवे नवे प्रकार दिसू लागले आहेत. कुणी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेते तर कुणी मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आणि शासन, प्रशासनाचे लक्ष वेधत असते. अशा जगावेगळ्या आंदोलनाने प्रशासनाची हालचाल होते तसेच वरिष्ठ पातळीवरून संबंधिताच्या प्रश्नाकडे पहिले जाते त्यामुळे अशा प्रकारची आंदोलने वाढताना दिसत आहेत. शासकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे नेहमीच डोळेझाक केली जाते परंतु आज एका सामान्य शेतकऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची दणादाण उडाल्याचे दिसून आले. 


तहसील कार्यालयात विविध कामांसाठी शेतकऱ्यांची गर्दी असते पण त्यांची कामे कधीच सहजासहजी होताना दिसत नाहीत. हेलपाटे घालून शेतकरी कंटाळतो पण त्याचे काम मात्र मार्गी लागत नाही. सामान्य शेतकरी हतबल होतो आणि महसूल विभागाचा नाद सोडून देतो किंवा कधी चिरीमिरी देवून काम होतेय का ? याची चाचपणी करतो. महसूल विभागाचे कर्मचारी शेतकऱ्याला सहजासहजी भीक घालत नाही एवढे काही कर्मचारी निर्ढावलेले असतात. अनेकदा असे कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेले देखील दिसतात पण दक्षिण सोलापूरच्या एका शेतकऱ्याने आज वेगळाच प्रकार केला आणि महसूल विभागाची अक्षरश: पळापळ केली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या समोर कुमार नामदेव मोरे या शेतकऱ्याने आपला वेगळाच प्रताप दाखवला. 


दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे शेती असलेल्या कुमार मोरे या शेतकऱ्याने आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या समोर आज या वृद्ध शेतकऱ्याने आपल्या अंगावरील सगळेच कपडे काढले आणि  नग्न होऊन त्याने तहसील समोर ठिय्या दिला. अचानक घडलेला हा प्रकार पाहून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली आणि या शेतकऱ्याला पाहण्यासाठीही आवारात गर्दी होऊ लागली. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पण आपल्याला ही भरपाई का मिळाली नाही ? असा या शेतकऱ्याचा सवाल होता. या मागणीसाठी ते तहसील कार्यालयात आलेले होते आणि आपल्या या मागणीसाठी त्यांनी आपल्या अंगावरील सगळेच कपडे काढून नग्न होऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. 


तहसील कार्यालयाच्या समोरच नग्न होऊन या शेतकऱ्याने ठिय्या मांडला त्यामुळे बघ्यांची तर गर्दी झालीच पण तहसीलच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कानावर याची  माहिती पोहोचली. शेतकरी पूर्ण नग्न होऊन तहसील कार्यालयासमोर बसला असल्याचे समजताच कर्मचाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले. कर्मचारी धावत पळत गेले आणि त्यांनी या शेतकऱ्याला कपडे घालायला लावले.  शेतकरी कुमार मोरे यांना तहसील कार्यालयात नेण्यात आले आणि त्यांना मिळणारी नुकसान भरपाई आधीच बँकेकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. 


१० नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा मदतनिधी बँकेकडे पाठविण्यात आला असून त्यासंबंधीची कागदपत्रे देखील मोरे यांना दाखविण्यात आली तेंव्हा कुठे मोरे शांत झाले. रक्कम बँकेकडे पाठवली असतानाही अजून हा चेक बँकेत कसा जमा होत नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बँकेची चूक असेल तर आपण तेथेही जाऊन नग्न आंदोलन करू असा इशारा त्यांनी याच वेळी देवून टाकला. 


सदर शेतकऱ्यास अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम न मिळण्यास तहसील कार्यालय जबाबदार आहे की बँकेची चूक आहे हे अधिक चौकशीत समोर येईलच पण या शेतकऱ्याने आज मात्र प्रशासनाला घाम फोडला आणि आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी वेगळ्या प्रकाराने केलेल्या या प्रयत्नाची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे. (An angry old farmer naked in front of the Tehsil office) शासनाने जाहीर केलेली मदत मिळविण्यासाठी सामान्य शेतकऱ्याला नग्न होण्यापर्यंतची वेळ येते याचीही चर्चा सुरु झाली असून या सर्व प्रकाराची चौकशी होण्याची मागणीही आता पुढे येऊ लागली आहे.


 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !