शोध न्यूज : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आव्हाड समर्थकांनी सकाळपासूनच जाळपोळ सुरु केली आणि खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे अत्यंत आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत तसे अभ्यासू नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. 'हर हर महादेव' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह दृश दाखविण्यात आली असून इतिहासाची मोडतोड करून दाखविण्यात आल्याचे वादळ महाराष्ट्रात उठले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भातील हा चित्रपट असून त्यातील मांडणी आणि दृष्ये न पटणारी असल्याची टीका सोशल मीडियावर देखील होत आहे.
याच संदर्भात जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बंद पाडला होता. यावेळी प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले होते. याविषयी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला परंतु न्यायालयाने त्यांना जामीन दिला. प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता परंतु संबंधित प्रेक्षकाचा एक व्हिडीओ समोर आला असून आव्हाड यांनी आपल्याला मारहाण केली नसून आपल्याला वाचविण्याचे काम त्यांनी केले असल्याचे या प्रेक्षकाने म्हटले आहे.
या अटकेप्रकरणी राज्यात असंतोष असताना आता आव्हाड यांच्यावर विनयभंग केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला गुन्हा खोटा असल्याचे म्हटले जात असतानाच विनयभंगासारखा मोठा गुन्हा आव्हाड यांच्यावर दाखल झाला आहे. हा गुन्हा देखील खोटा आहे असे म्हणत आमदार आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. भाजपच्या एका महिलेने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आमदार आव्हाड यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे परंतु राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आणि संतप्त झाले आहेत. (Molestation case
aginst Ncp Mla Jitendra avhad ) यांनी आज सकाळपासून टायर पेटवून जाळपोळ सुरु केली असून पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या दिला आहे. जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे त्यामुळे वातावरण तंग बनताना दिसत आहे.
"अंगावर धडकणाऱ्या महिलेला बाजूला करणे हा जर विनयभंग होत असेल तर मग बाजारात, रेल्वे पुलावर, गर्दीत, रेल्वेत रोज शेकड्यावर विनयभंग होत असतील ?" ऋता आव्हाड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुलाच्या उद्घाटनाला गेले असताना यावेळी आव्हाड देखील तेथे होते. गर्दी झाल्याने गर्दीतून वाट काढत, लोकांना बाजूला सारत ते निघाले होते. यावेळी सदर महिला समोर आली असताना या महिलेच्या खांद्याला हात लावून त्यांना बाजूला सारल्याचे या घटनेच्या व्हिडीओत दिसत आहे. ७२ तासात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले असून असे खोटे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केले असून आव्हाड यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे.
"पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हे दाखल केले आणि तोही ३५४...मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत !" असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
या घटनेने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून कार्यकर्ते संतप्त आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. या संदर्भात राष्टवादी राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. दरम्यान आव्हाड हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याची चर्चा आहे. तक्रात दाखल करणाऱ्या महिलेकडे मोटीव्ह होतं. तक्रार दाखल करणारी महिला जामिनावर बाहेर आहे असे आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी म्हटले आहे. एवढी गर्दी असताना हाताला धरून बाजूला केले हे त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर लक्षात आले काय ? असा सवाल ऋता आव्हाड यांनी केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !