BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ नोव्हें, २०२२

भीमा सहकारीचा आज फैसला , प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा निर्णय !




शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत असून नेत्यांच्या प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा फैसला आज होणार आहे. या निकालाकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने गेले काही दिवस वातावरण चांगलेच तापले आहे. काही वाद आणि पातळी सोडलेली टीका तसेच आक्षेपार्ह विधाने यामुळे ही निवडणूक अधिकच वादाची ठरली आहे, माजी आमदार राजन पाटील यांनी केलेली वादग्रस्त विधाने त्यांना आणि त्यांच्या गटाला अडचणीत आणतात काय ? याचे उत्तर देखील आज मिळणार आहे. भीमा सहकारीचे विद्यमान अध्यक्ष आणिभाजप खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यात या निवडणुकीत परस्परांवर बऱ्याच तोफा डागल्या गेल्या आहेत परंतु सभासदांचा नेमकी काय इच्छा आहे हे आज आकडेवारीतून समोर येणार आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात माजी आमदार यांनी केलेली विधाने मात्र मोठ्या वादाची ठरली आहेत. 


भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले आणि सभासदांनीही मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसत होते. या निवडणुकीत १९ हजार ४३० सभासदांपैकी १५ हजार ३२३ सभासदांनी मतदान केले आहे. निवडणुकीत ७८.८६ टक्के मतदान झाले असून आज काडादी मंगल कार्यालयात मतमोजणी होत आहे. कारखान्याचा १५ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात उतरले होते आणि सभासदांनी अत्यंत उत्साहात मतदान केले आहे. या निवडणुकीत मात्र राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांना मात्र मतदान करता आलेले नाही. मतदार यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांना तसेच अन्य काही विरोधी नेत्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. सभासदांच्या मताचा कौल आज मिळणार असून मोठा फैसला आज समोर येणार आहे. महाडिक यांच्याकडे कारखान्याची सत्ता आहे परंतु या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांच्याकडेच सत्ता राहणार की सत्तांतर घडणार याचे उत्तर आज मिळणार आहे.


राजन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या गटाने निवडणुकीत नेटाने प्रचार केला असून प्रचारात मोठी आक्रमकता देखील दिसून आली त्यामुळे जिल्हाभरात या निवडणुकीची चर्चा कायम सुरु राहिली. (Bhima Sugar Factory Election, counting of votes today)दोन्ही गटाने विजयाचा दावा केला असून या निवडणुकीत विरोधकांची अनामत देखील जप्त होईल असा विश्वास अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सभासदांनी कुणाला पसंती दिली आहे हे आज स्पष्ट होणार आहे.

   

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला !

भीमा सहकारीच्या या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची ही निवडणूक ठरणार आहे. खासदार धनंजय महाडिक विरुद्ध माजी आमदार राजन पाटील यांच्यात हा सरळ सामना आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पाठींबा दिला आहे तर माजी आमदार प्रशांत परिचारक हे राजन पाटील यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी देखील धनंजय महाडिक यांना पाठींबा दर्शविला आहे त्यामुळे अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होत आहे.   


चार वाजेपर्यंत निकाल !

कारखाना निवडणुकीचा निकाल दुपारी चार वाजेपर्यंत पूर्णपणे हाती येईल अशी अपेक्षा असून २८ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दोन फेऱ्यात ही मतमोजणी केली जाणार असून पहिल्या फेरीत १ ते २८ आणि दुसऱ्या फेरीत २९ ते ५६ अशी बूथनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. 


 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !