शोध न्यूज : दरमहा येणारी तुट वाढू लागल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली असून वीज बील न भरणाऱ्या ग्राहकांना याचा सामना करावा लागणार आहे.
महावितरण सतत वसुलीच्या वेगवेगळ्या मोहिमा राबवीत असते. वीज बिलांच्या वसुलीसाठी अनेवेळा कठोर उपाय योजण्याची वेळ महावितरणवर येत असते. अपेक्षित महसूल जमा होत नसल्यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत येते त्यामुळे थेट वीज जोडण्या कापण्याची मोहिम हाती घेण्यात येत असते. वीज वापराच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात वसुली होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मुंबई वगळून राज्यात रोज २२ हजार मेगावॉटपर्यंत वीज वापरली जात आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याला सात हजार कोटी रुपये महावितरणच्या तिजोरीत येणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात असे घडत नसून प्रत्येक महिन्याला दीड हजार कोटींची तूट येत आहे.
ग्राहकांकडील थकबाकी ही महावितरण समोरील कायमची समस्या आहे. थकबाकीचे आकडे देखील वाढतेच आहेत. शेती आणि बिगरशेती यांची ५७ हजार कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीमुळेच महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांचे, विशेषत: शेतीच्या विजेचे कनेक्शन कापण्याची मोहीम राबविण्यात येणार असून चालू दोन बिले भरल्याशिवाय विजेचे कनेक्शन जोडले जाणार नाही असा पवित्राच आता महावितरणने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यासह नाशिक, नगर आणि अन्य काही जिल्ह्यातील शेतीपंपाचे ट्रान्सफार्मर बंद करण्यात आलेले आहेत. (Mahavitran starts a campaign to cut electricity connection) सुमारे १४ हजार शेकऱ्यांच्या वीज जोडण्या कापण्यात आल्या असून थकबाकी न भरल्यास कमीतकमी दोन तासांचे भारनियमन करण्याची तयारी देखील सुरु असल्याची चर्चा आहे.
शेतकरी एका पाठोपाठ एका अडचणीत सापडत असताना आता महावितरणचा बडगा सुरु झाला आहे. राज्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान केलेलं आहे, अशातच बँक कर्जाचा वसुलीचा तगादा लावत आहे, शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत आणि खाजगी सावकारीच्या विळख्यात तो अधिकच अडकत चाललेला आहे. साखर कारखाने एकरकमी एफआरपी देत नाही, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. वेगवेगळ्या ओझ्याखाली शेतकरी दबला जात असताना आता महावितरणची वीज तोडणी मोहीम सुरु झाली आहे त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत येत आहे. एकीकडे ही परिस्थिती असली तरी विजेचे बिल भरणे हे देखील तितकेच आवश्यक ठरत आहे. महावितरणला देखील पैशाची गरज पडते आणि त्याशिवाय सुरळीत विद्युत पुरवठा करणे महावितरणला शक्य नसते. अशा परिस्थितीत शासनानेच महावितरणला सहाय्य करावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
४८.२७ लाख शेतीचे ग्राहक असून शेतीची थकबाकी ४५ हजार कोटी आहे. बिगरशेतीची थकबाकी १२ हजार कोटी असून ५७ हजार कोटींची एकूण थकबाकी आहे. शेतीपंपाची थकबाकी अधिक असल्यामुळे चालू दोन बिले तरी शेतकऱ्यांनी भरणे आवश्यक बनले आहे. पुन्हा पुन्हा आवाहन करूनही थकबाकीदार बिले भरत नाहीत त्यामुळे त्याचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ लागले आहे. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 'शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र' करण्याची घोषणा केली होती परंतु या केवळ घोषणाच राहिल्या असल्याचे दिसत आहे. आठ तास मिळणारी वीज आता केवळ पाच ते सहा तास मिळत असल्याने शेतकरी विजेच्या संकटात आहे त्यात आता तोडणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !