शोध न्यूज : बंदी असलेले तणनाशक विकून शासन आणि शेतकरी यांची फसवणूक केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एक कृषी केंद्रावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी आधीच एकाहून एक अडचणीत येत असताना बळीराजालाही फसविण्याचा धंदा काही जण नेटाने आणि जोमाने करीत असल्याचे दिसून येते. बोगस बियाणे, खते विकून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते आणि अधूनमधून अशा भामट्या दुकानदारांवर कारवाईही होते. दरम्यान शेतकऱ्यांची पिके आणि कष्ट मातीत मिसळलेले असते. आता तणनाशके विकून पुन्हा बळीराजाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ओंकार कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीला आल्याने शेतकरी देखील धास्तावले असून खळबळ उडाली आहे. राज्यात बंदी असलेले मॉडर्न कंपनीचे तणनाशक बिनधास्तपणे विकून शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकली जात होती.
सोलापूर जिल्हा गुणवत्ता नियंत्रक धनंजय पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार ओंकार कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉडर्न कंपनीच्या तणनाशक विक्री करून शासनाची आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कृषी केंद्राबाबत पंढरपूर तालुका कृषी विभागाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. संजय राजाराम पवार यांच्या या ओंकार कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी तणनाशक खरेदी केले होते आणि छाटणीअगोदर द्राक्ष बागेत फवारणी केली होती परंतु द्राक्ष बाग फुटलीच नाही, एकही काडी तयार झालीच नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांनी सदर कृषी केंद्राबाबत तक्रार केली होती.
शेतकरी बांधवांच्या तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने करकंब येथील ओंकार कृषी केंद्रावर धडक मारली आणि तपासणी केली असता सगळे बिंग फुटले. महाराष्ट्र राज्यांमध्ये विक्रीचा परवाना नसलेले मॉडर्न अँग्रीजेनेटिक लिमिटेड कंपनीचे 'ग्लायफोसेट ४१' तणनाशक विकले जात असल्याचे कृषी विभागाच्या तपासणी पथकास आढळून आले. बंदी असतानाही या तणनाशकाची परस्पर विक्री करून 'कीटकनाशके अधिनियम १९६८' च्या तरतुदीनुसार नियमाचा भंग केल्याचे निदर्शनास आले आणि सदर केंद्र चालकाकडे तणनाशक विक्रीचा परवाना आढळून आला नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कृषी केंद्रातून महाराष्ट्रात विक्री परवाना नसलेले मॉडर्न कंपनीचे 'ग्लायफोसेट ४१' या तणनाशकाच्या विक्रीसाठी ठेवलेल्या एक लिटरच्या ४ बाटल्या दुकानात आढळून आल्या.
सदर तणनाशक विक्रीसाठीचा कोणताही परवाना दुकानदाराकडे नव्हता. यातील तीन बाटल्या सीलबंद करून तपासणीसाठी ताब्यात घेतल्या. त्यातील एक बाटली पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आली. याबाबतचा अहवाल कृषी अधिकायांनी १० नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविला होता. या अहवालानुसार कंपनी व दुकानदार यांनी कीटकनाशक अधिनियम १९६८ मधील नियमांचा भंग केल्याचे दिसून आले. (case registered against the Agriculture Centre) त्यानुसार सदर कृषी केंद्राच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची माहिती मिळाल्यावर शेतकरीवर्गात खळबळ उडाली असून आपली फसवणूक झाल्याचे त्यांचा लक्षात आले. शेतकरी आणि महाराष्ट्र शासनाची देखील या प्रकरणात फसवणूक झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !