शोध न्यूज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वादळ उठले असून कोश्यारी यांचे धोतर फडणाऱ्या आणि फेडणाऱ्या व्यक्तीस बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
राज्यपाल हे घटनात्मक आणि अत्यंत सन्मानाचे पद आहे. या पदावरील व्यक्तीला प्रचंड मान आणि सन्मान आहे तसा या पदावरील व्यक्तीनेही या पदाचा सन्मान राखणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाची अनेक मोठी पदे भोगलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांची विधाने मात्र गेल्या दोन वर्षात सतत वादग्रस्त ठरत असून त्यामुळे या पदाच्या सन्मानालाही धक्का लागू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या आधीही केलेली विधाने संतापजनक ठरली असताना आता पुन्हा एकदा त्यांनी राजे शिवछत्रपती यांच्याविषयी केलेल्या विधानांमुळे शिवप्रेमींच्या भावना प्रचंड दुखावल्या आहेत. संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आजवर कधीही राज्यपाल या पदावरील व्यक्तींच्या संदर्भात बोलले गेले नव्हते तेवढे बोलले जाऊ लागले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सावरकर वाद सुरु झाला आहे आणि त्यातच भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाची विधाने एकामागून एक अशा पद्धतीने येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून पुनः एकदा शिवरायांबाबत आलेल्या विधानांनी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावरून जोरदार संताप उफाळून आलेला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यातच पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी चक्क फलक लावून आपला संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्याला आणि फेडणाऱ्याला १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
" आमचं आराध्य दैवत छत्रपती होते, आहेत आणि राहणारच... उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचा जाहीर निषेध...!" असा मजकूर लिहिलेले फलक पुण्यात लावण्यात आले असून "राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यास व फेडणाऱ्यास १ लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाईल" अशी टीप लिहिण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात राज्यपालांच्या संदर्भात असा प्रकार पहिल्यांदाच घडताना दिसत आहे. (Anger over Governor Bhagatsingh Koshyari's controversial statements) राज्यपाल कोश्यारी यांनी या आधीही मराठी माणसांच्या संदर्भात मने दुखावणारी विधाने केली आहेत तसेच राष्ट्रपुरुषांनाही कमी लेखणारी विधाने केली आहेत. आता पुन्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना राजकीय नेत्यांशी केली आहे त्यामुळे राज्यात संतापाची भावना निर्माण झालेली आहे.
सोलापुरातून बक्षीस
राज्याच्या सर्वच भागातून संतापाचे पडसाद उमटत असताना सोलापूर येथूनही तीव्र संतप व्यक्त करण्यात आला असून राज्यपाल यांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी, भाजप नेते सुरेंद्र त्रिवेदी यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) आक्रमक झाली असून कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल यांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस सोलापूर शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याच्या पायाला कोश्यारी, भाजपचे नेते त्रिवेदी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.
रोखठोक इशारा !
सोलापूर शिवसेनेने केवळ बक्षीस जाहीर केले नाही तर रोखठोक इशारा देखील दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत खरोखरच प्रेम असेल तर त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा, सोलापूर शिवसेना मात्र राज्यपाल कोश्यारी यांचे धोतर फेडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा रोखठोक इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी दिला आहे.
भाजपाला राजे का खुपतात ?
राज्यपाल यांच्या विधानांचा सर्वत्र निषेध होत असतानाच भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराज का खुपतात ? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. आधीच त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता परंतु आता पुन्हा त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून संतापला वाट करून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत भाजपने आपली नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे असेही खा. कोल्हे यांनी म्हटले आहे.
दानवे पोलिसांच्या ताब्यात !
राज्यात आक्रमकपणे आवाज उठवला जाऊ लागला असून सर्वच राजकीय पक्ष संतप्त दिसत आहेत. शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांना आंदोलन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती शिवसेनेच्या ट्वीटर वरून देण्यात आली आहे. संभाजीनगर येथे आंदोलन सुरु असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
राज्यभर संताप !
राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह संभाजी ब्रिगेड, मराठा मोर्चा यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून जोरदार निषेध सुरु आहेत. रास्ता रोको, प्रतिमेला जोडे मारणे, घोषणाबाजी अशा वेगवेगळ्या प्रकाराने निषेध सुरु आहेत. 'राज्यपाल हटाव' ची जोरदार मागणी होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !