BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ नोव्हें, २०२२

नकली भाऊ, नकली आधार कार्ड, सात बारा वरील नाव गायब !

 


शोध न्यूज : खोटे आधारकार्ड तयार करून आणि खोटा भाऊ उभा करून शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी फसगत झालेल्या भावाने पोलीसात धाव घेतली आहे.


'सख्खा भाऊ, पक्का वैरी' याचा अनुभव अनेक ठिकाणी येतो, विशेषत: वडिलार्जित जमीन अथवा संपत्ती या विषयात भावाभावात वैर निर्माण होते. या संपत्तीसाठी भाऊ आपल्याच भावाच्या जीवावर उठतो हे अनेकदा समोर येत असते. मंगळवेढा तालूक्यात तर एका भावाने आपल्याच भावाला गंडा घातला आहे आणि भावाचेच खोटे आधार कार्ड तयार करून आणि नकली भाऊ उभा करून चक्क जमिनीची विक्री करण्याचे कारस्थान केले आहे. याबाबत भावानेच पोलिसात धाव घेतली आहे. शेतजमिनीच्या खरेदी विक्रीत अनेकदा फसवणूक केली जाते पण येथे सख्ख्या भावालाच अशा प्रकाराने फसविण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. खोटेपणाने बरेच कारस्थान केले असले तरी ते उघडे पडले आहे.


थोरल्या भावाचे नकली आधार कार्ड तयार करून आणि भाऊ म्हणून दुसराच व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात उभा करून जमीन आपल्या नावावर खरेदी करून घेण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील तांडोर शिवारातील जमिनीबाबत झालेला हा प्रकार आता पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. सिद्धापूर येथील संजय महादेव रजपूत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संजय रजपूत आणि त्यांचा लहान भाऊ राजकुमार यांनी दोघांनी मिळून सन २००३ मध्ये तांडोर हद्दीत शेतजमीन विकत घेतली होती. संजय रजपूत यांना बँक कर्जासाठी जमिनीच्या कागदपत्रांची आवश्यकता भासली म्हणून त्यांनी या जमिनीचा सात बारा उतारा काढला आणि त्यांना धक्काच बसला. या जमिनीच्या उताऱ्यावर त्यांचे नाव नव्हते तर भावाचा साडू किसनसिंग रजपूत याचे नाव उताऱ्यावर असल्याचे दिसून आले. 


आपण खरेदी केलेली जमीन आपल्या नावावर नसल्याचे पाहून संजय रजपूत हादरून गेले आणि त्यांनी अधिक खोलात जाऊन जमिनीसंदर्भात कागदपत्र प्राप्त केली. ही कागदपत्रे पाहून त्यांना दुसरा धक्का बसला. आपणच ही जमीन विकली असल्याचे त्यांना या कागदपत्रावरून दिसून आले. असे असले तरी तयार केलेल्या दस्तात असलेला फोटो आणि सही मात्र कुणा अन्य अनोळखी व्यक्तीची असल्याचे दिसून आले. एकूण प्रकार लक्षात येताच संजय रजपूत यांनी पोलिसात फिर्याद दिली असून दुय्यम निबंधक कार्यालयात आपल्या ऐवजी कुणी अन्य व्यक्ती उभा करून जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याची तक्रार संजय रजपूत यांनी केली आहे. भावाच्या नावावरील जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी खोटे आधारकार्ड आणि खोटी व्यक्ती उभी केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. 


सहा जणांविरुद्ध गुन्हा !

या प्रकरणात खरेदीसाठी आवश्यक असलेले साक्षीदार हे मात्र ओळखीचे आहेत. सदर फसवणूक केल्याप्रकरणी राजकुमार महादेव रजपूत, मनोहर सिद्राम कोळी, पैगंबर मदरशहा मकानदार, नितीन जालिंदर भजनावळे, वैभव राजकुमार रजपूत आणि अनोळखी तोतया व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fake brother, fake aadhaar card transfer of land) या फसवणूक प्रकरणाची मोठी चर्चाही सुरु झाली आहे. 


      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !