BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ नोव्हें, २०२२

स्वप्ने पाहिली आमदारकीची पण हातात पडल्या बेड्या !




शोध न्यूज : पोलीस अधिकारी आमच्या ओळखीचे आहेत असे सांगून दलाली करू पाहणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.

लाचखोरीत पोलिसांचे नाव नेहमीच आघाडीवर येत असते परंतु पोलिसांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार देखील आता पकडण्यात आला आहे. अनेक शासकीय कार्यालयाशी दलाल संबंधित असतात. शासकीय कार्यालयात अनेकांची कामे अडलेली असतात, अशी कामे करून देतो म्हणून काही दलाल या कार्यालयाच्या अवतीभवती वावरत असतात. या प्रकारात अनेकांची फसवणूक देखील होत असते. अधिकाऱ्याशी आपली ओळख आहे, आपले जवळचे संबंध आहेत असे दाखवून आणि भासवून देखील फसवणूक करणारे भामटे शासकीय कार्यालयाच्या अवतीभवती वावरत असतात. सोलापुरात तर चक्क पोलीस अधिकाऱ्याचे नाव वापरून पैसे मिळविण्याचा धंदा करणारे दोन भामटे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहेत. पोलीस निरीक्षक आमच्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडून तुमचे काम करून देतो असे सांगत दीड लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. 

सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात एका पन्नास वर्षीय महिलेविरोधात तक्रारी अर्ज आलेला होता. या अर्जावर होणारी कारवाई टाळण्याच्या भूलथापा देत दोघांनी महिलेला गाठले. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आमच्या परिचयाचे आहेत. तुमच्या विरोधात कारवाई करू देणार नाही, परंतु त्यासाठी दीड लाख रुपये लागतील अशी बतावणी दोघांनी केली. जुळे सोलापूर येथे राहणारा युवराज भीमराव राठोड आणि साजन रमेश हावळे यांनी अशा पद्धतीने दीड लाख रुपये मिळविण्याचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे यातील आरोपी युवराज राठोड हा आमदार होऊ इच्छित होता. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून त्याने वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमुळे राठोड अनेकांच्या परिचयाचा झाला आहे. त्यानंतर राजकारणातील त्याचा वावर कमी झाला आणि पोलीस वर्तुळात त्याचा वावर वाढला होता.  

आमदारकीची स्वप्ने पाहिलेल्या युवराज राठोड याने आणि साजन हावळे या दोघांनी संबंधित महिलेला  जुळे सोलापुरातील सावन हॉटेल समोर बोलावून घेतले आणि तेथे या महिलेकडे दीड लाख रुपये लाच मागितली होती. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आमच्या परिचयाच आहेत. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाही अशा बतावण्या करीत या महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ देणार नाही असे सांगितले. सदर महिलेने मात्र याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार दाखल केली. 

तक्रार दाखल होताच पुढील हालचाली सुरु झाल्या आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून सर्व संभाषण कैद केले होते. सदरचे संभाषण हे जुलै महिन्यात झालेले होते तेंव्हापासून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या पद्धतीने सापळा लावला परंतु संबंधित पोलीस निरीक्षक संबंधित महिलेला भेटलेच नाहीत. (The dream of MLA was arrested for bribery) तक्रार आल्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रयत्नशील होता आणि महिला पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात जात होती परंतु अधिकारी आणि महिला यांच्यात भेट झालीच नाही.

'मांडवली' बादशहा !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राठोड आणि हावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि या दोघांच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.  राठोड हा सतत पोलीस ठाण्याच्या संपर्कात वावरत असायचा. 'मांडवली बादशहा' अशी स्वत:ची ओळख करून देत पोलीस ठाण्यातील कसलीही कामे आपण करून देतो असे तो लोकांना सांगत असायचा अशी देखील माहिती पुढे आली आहे. अशी कामे करून देण्यासाठी तो लोकांकडे मोठ्या रकमेची मागणी करायचा. आता मात्र या 'मांडवली बादशहा' ला गजाआड जाऊन बसावे लागले आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !