BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ नोव्हें, २०२२

जमिनीच्या वादातून पंढरपूर तालुक्यात चाकू हल्ला, दगडाने मारहाण !

 



शोध न्यूज :शेत जमिनीच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारामारीत पंढरपूर तालुक्यातील आठ जणांच्या विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दगड आणि चाकूने मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी (पवार वस्ती) येथील मोहन शिवाजी पवार यांनी या घटनेबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेत जमिनीच्या मोजणीवरून हा प्रकार घडला असल्याचे म्हटले आहे. मोहन पवार यांनी विजय रामदास मगर यांची ४५ गुंठे जमीन चार महिन्यापूर्वी खरेदी केली होती. या जमिनीची मोजणी १५ नोव्हेंबर रोजी करण्यात येत होती. या जमिनीच्या मोजणीसाठी गावातील पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष यांना देखील बोलावण्यात आले होते. मोहन पवार यांचे भाऊ तानाजी तसेच वडील शिवाजी पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. जमिनीची मोजणी करीत असताना शेजारी शेती असलेले चुलते शंकर भगवान पवार, चुलती छाया शंकर पवार, चुलत भाऊ बापू शंकर पवार, आप्पा शंकर पवार हे तेथे आले. यावेळी चुलती छाया पवार यांनी मोजणीला विरोध केला.


सदर जमीन माझ्या भावाची असून मी हिस्सा घेणार आहे त्यामुळे तुम्ही मोजणी करू नका असे छाया पवार यांनी सांगितले. यावेळी चुलत भाऊ बापू व आप्पा यांनी तेथे पडलेले दगड उचलून मारण्यास सुरुवात केली. यावेळी पाठीत, कानावर, हातावर तसेच अन्य ठिकाणी दगडांचा मार लागला. मोहन पवार यांचे वडील शिवाजी पवार हे मध्ये पडले आणि मारू नका असे सांगू लागले तेंव्हा त्यानाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी बापू याने हातातील चाकू वडिलांना मारला. उजव्या पायाच्या अंगठ्यावर चाकू लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. पोलीस पाटील तानाजी पाटील आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण देठे यांनी मध्ये पडून भांडण सोडवले. यावेळी देठे यानाही मार लागला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी धोंडेवाडी येथील शंकर भगवान पवार, बापू शंकर पवार आणि आप्पा शंकर पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


 दुसरीही फिर्याद दाखल !

याच घटनेत बापू शंकर पवार यांनीही पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  आपण विजय रामदास मगर आणि शहाजी भगवान पवार यांच्याकडून तीन एकर सात गुंठे जमीन खरेदी केली आहे. आपल्या आईने बहिणीचा हिस्सा मिळावा म्हणून  विजय मगर आणि शिवाजी पवार यांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात दावा केलेला असून तो सद्या न्यायालयात सुरु आहे. आपण लहान भाऊ अप्पा याच्यासह घराच्या समोर थांबलो असताना चुलत भाऊ आणि चुलते मोहन शिवाजी पवार, तानाजी शिवाजी पवार, शिवाजी  भगवान पवार, शहाजी भगवान पवार, रणजीत संजय पवार हे तेथे आले.


"तुमच्या घरासमोरून शेताकडे का जाऊ देत नाही ? तुमच्या बापाचा रस्ता आहे काय ?' अशी विचारणा करीत शिवीगाळ सुरु केली आणि तानाजी पवार, शिवाजी पवार यांनी आपणास पकडले तर मोहन पवार याने दगडाने मारले. शहाजी पवार यांनीही हातात दगड घेवून खुब्यावर मारले. यावेळी अन्य काही जण धावून आले आणि त्यांनी सोडवासोडावी केली.या मारहाणीत मार लागला आहे अशा आशयाची फिर्याद बापू पवार यांनी दिली आहे. (Knife attack, stone pelting due to land) त्यानुसार मोहन शिवाजी पवार, तानाजी शिवाजी पवार, शिवाजी भगवान पवार, शहाजी भगवान पवार, रणजीत संजय पवार (सर्व धोंडेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !