शोध न्यूज : पंढरपूर - शेटफळ रस्त्यावर एका दुचाकीला कारने उडवले असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर कारचालक अपघात करून पळून गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात दिवसाआड तर कधी रोजच कुठे ना कुठे अपघात होत असून यात अपघाती मृत्यू समोर येताना दिसत आहेत. पंढरपूर - शेटफळ रस्त्यावर बाभूळगावजवळ आणखी एकाचा अपघाती मृत्यू झाला असून याबाबत बाभूळगाव येथील पोलीस पाटील आनंद नागनाथ कोळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोळी हे त्यांचे जोडीदार सागर शिंदे यांच्या सोबत दुचाकीवरून पंढरपूरला गेले होते. तेथील काम झाल्यावर ते परत बाभूळगाव येथे जात असताना रेणुका कला केंद्राच्या समोर त्यांची भेट विक्रम चव्हाण आणि दाजी शिंदे यांच्यासोबत झाली. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला बोलत थांबले असतानाच हा अपघात झाला. एक दुचाकीस्वार चादर आणि बेडशीटचे लोड घेवून पंढरपूरच्या दिशेने निघाला होता.
पंढरपूरकडून शेटफळच्या दिशेने निघालेली चार चाकी वाहन वेगात आले आणि या कारने सदर दुचाकीला कट मारून निघून गेला. यावेळी मोठा आवाज झाला आणि दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्याच्या कडेला वेगाने फेकला गेला, या आवाजाने आनंद कोळी आणि इतर काही जण त्याच्याकडे धावले असता पडलेल्या दुचाकीस्वराला जोराचा मार लागल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्याला मार लागलेला होता आणि तोंडातून रक्त येत होते. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेस त्यांनी तातडीने बोलावून घेतले. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी जखमीची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. कोळी यांनी पंढरपूर तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली. तालुका पोलीस तातडीने दाखल झाले आणि त्यांनी दुसरी एक रुग्णवाहिका बोलावून सदर व्यक्तीस उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
मयत व्यक्तीच्या खिशातील आधारकार्डावरून या व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. सदर व्यक्तीचे नाव अन्वरखान हबीबखान पठाण असे असून तो जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील जीन झोपडपट्टी भाग कासोदा येथील असल्याची माहिती मिळाली आहे. (Accident, Pandharpur- Shgetafal Road) अपघात केलेला कार चालक मात्र अपघात केल्यानंतर थांबला नसून तो पळून गेला आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी अज्ञात कार चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !